गोवा खबर : एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ESG), गोवा डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या सार्वजनिक दंत आरोग्य विभाग तसेच आरोग्य सेवा संचालनालयाच्या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या संयुक्त विद्यमाने ८वा गोवा अँटी टोबॅको फिल्म फेस्टिव्हल २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम ३१ मे २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता माकिनेज पॅलेस, ESG, पणजी येथील ऑडिटोरियम क्रमांक १ मध्ये होणार आहे. दरवर्षी ३१ मे हा दिवस ‘जागतिक तंबाखूमुक्त दिन’ म्हणून साजरा केला जातो.
या कार्यक्रमासाठी गोवा सरकारचे आरोग्य सचिव येतिंद्र एम. मराळकर (IAS) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, तर डॉ. संदेश मडकईकर, मुख्य वैद्यकीय अधिकारी, नॉन-कम्युनिकेबल डिसीज सेल, आरोग्य सेवा संचालनालय, पणजी हे मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी आणि तोंडाचा कर्करोग तसेच फुफ्फुसांच्या आजारांचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने या फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येते. यावर्षीच्या “Unmasking the Appeal: Countering Nicotine & Tobacco Addiction” या संकल्पनेला अनुसरून जनजागृती करणाऱ्या जाहिरातपटांची निवड करण्यात येत आहे. गोवा तंबाखूमुक्त करण्याच्या उद्दिष्टाला हातभार लावणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.
स्पर्धा गोवा विभाग आणि राष्ट्रीय विभाग अशा दोन गटांमध्ये आयोजित करण्यात आली होती. गोवा विभागातील विजेत्यांना अनुक्रमे ५० हजार, ३० हजार आणि २० हजार रुपये, तर राष्ट्रीय विभागातील विजेत्यांना १ लाख, ५० हजार आणि ३० हजार रुपये अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.
यंदाच्या स्पर्धेसाठी गोवा विभागातून ९ तर राष्ट्रीय विभागातून ६ प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत. पुरस्कार वितरण समारंभानंतर स्पर्धेत सहभागी झालेल्या चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून प्रवेश ‘फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह’ तत्त्वावर दिला जाणार आहे. आयोजकांनी नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.