Connect with us

गोवा खबर

गोव्याचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी तरुणांनी एकत्र यावे; गोवा फॉरवर्ड पक्षाकडून राज्यव्यापी सदस्य नोंदणी मोहिमेला सुरुवात

Published

on

Spread the love

मडगाव : गोव्याचे हक्क, इथली शांतता आणि अस्मिता वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असून, तरुणांनी मोठ्या संख्येने या कार्यात पुढे आले पाहिजे, असे आवाहन गोवा फॉरवर्ड पार्टीचे अध्यक्ष तथा फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी केले आहे. गोवा फॉरवर्ड पार्टीच्या वतीने काल सोमवारपासून राज्यव्यापी सदस्य नोंदणी मोहिमेला जाहीर सुरुवात करण्यात आली असून, या मोहिमेचा शुभारंभ आमदार विजय सरदेसाई यांच्या हस्ते मडगाव येथे करण्यात आला. ‘गोव्याला वाचवण्यासाठी एकत्र या’ अशी साद त्यांनी यावेळी गोमंतकीयांना घातली.

राज्यातील सद्यस्थितीवर आणि बेरोजगारीवर चिंता व्यक्त करताना सरदेसाई म्हणाले की, गोव्यातील अनेक तरुण उच्चशिक्षित असूनही आजही बेरोजगार आहेत. शिक्षण पूर्ण करूनही त्यांना त्यांच्या पात्रतेनुसार योग्य नोकऱ्या मिळत नाहीत. नोकरभरती प्रक्रियेमध्ये अजिबात पारदर्शकता नसून, सर्वसामान्यांच्या मुलांना संधी नाकारली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. धार्मिक सलोख्यासाठी जगभरात ओळखल्या जाणाऱ्या आपल्या शांत गोव्यात आता केवळ धर्म आणि जातीच्या नावावर समाजात जाणीवपूर्वक फूट पाडली जात आहे. गोवा हे नेहमीच शांत आणि एकत्रित राहणारे राज्य असून, ही सामाजिक एकता कोणत्याही परिस्थितीत टिकवून ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.

विजय सरदेसाई यांनी विद्यमान सरकारवर अत्यंत तिखट शब्दांत टीका करताना, हे सरकार पूर्णपणे असंवेदनशील, अहंकारी आणि अज्ञानी असल्याचे म्हटले. सत्तेत असलेल्या लोकांचा भ्रष्टाचार आणि अपयश आता त्यांच्याच पक्षातील लोकांना मान्य करावे लागत आहे. एकेकाळी शांत असलेल्या या राज्यात आता गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. कोळसा प्रदूषण, रेल्वेचे दुहेरीकरण यामुळे अनेक लोकांची घरे उद्ध्वस्त होत आहेत, तर गोव्याची मौल्यवान जमीन बाहेरील लोकांना सर्रास विकली जात आहे. या सर्व संकटांपासून गोव्याचे भविष्य सुरक्षित करायचे असेल, तर तरुणांच्या सामर्थ्यावर आणि नेतृत्वावर विश्वास ठेवणारी ‘गोवा फॉरवर्ड पार्टी’ हाच एकमेव समर्थ पर्याय आहे. आपण सर्वांनी ‘गोय आणि गोयकारपण’ या एकाच भावनेने एकत्र आले पाहिजे. ज्या इच्छुकांना या मोहिमेत सहभागी व्हायचे आहे, त्यांनी ऑनलाइन नोंदणीसाठी ‘membership.goaforward.in’ या संकेतस्थळाचा वापर करावा आणि एकत्र येऊन गोव्याचे उज्ज्वल भविष्य घडवावे, असे आवाहन त्यांनी केले.