वाळपईच्या वैद्यकीय अधिकाऱ्याला केले निलंबित; कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर
गोवा खबर : सत्तरी तालुक्यातील नगरगाव पंचायत क्षेत्रातील एका ११ वर्षीय मुलाला वाळपई येथील सरकारी रुग्णालयात योग्य उपचार न मिळाल्याने त्याच्या पायाला गँगरीन झाले आणि परिणामी त्याचा पाय कापावा लागल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे संपूर्ण राज्यभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणाची दखल घेत काल, सोमवारी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी थेट मुलाच्या घरी जाऊन त्याची व त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
यावेळी मंत्री राणे यांनी मुलाशी आणि त्याच्या कुटुंबाशी संवाद साधला. सरकारी यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे आणि वेळेत योग्य वैद्यकीय सेवा न मिळाल्यामुळे या चिमुरड्यावर ओढवलेल्या परिस्थितीबद्दल त्यांनी मुलाच्या कुटुंबाची जाहीर माफी मागितली. “मुलाला आणि तुम्हाला ज्या मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागले आहे, त्याची मला पूर्ण कल्पना आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
नेमके काय घडले होते? मिळालेल्या माहितीनुसार, गौरव सावर्डेकर या ११ वर्षीय मुलाचा पाय फ्रॅक्चर झाला होता. त्याला उपचारासाठी वाळपई येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तिथे पायावर प्लास्टर करताना संबंधित डॉक्टरांनी आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी योग्य ते लक्ष दिले नाही. डॉक्टरांच्या या हलगर्जीपणामुळे मुलाची जखम वेळेत बरी न होता पुढे अधिक गंभीर बनली आणि त्याचे रूपांतर गँगरीनमध्ये झाले. अखेर मुलाचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांना त्याचा पाय कापावा लागला.
वैद्यकीय अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई या गंभीर प्रकारानंतर आरोग्यमंत्री राणे यांनी तात्काळ कडक पावले उचलली आहेत. वाळपई सरकारी रुग्णालयाच्या संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याला सेवेतून कायमचे निलंबित करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. यासोबतच, या पीडित मुलाच्या कुटुंबाला सरकारतर्फे आर्थिक मदत देण्याची घोषणाही मंत्री राणे यांनी केली. काल त्यांनी काही स्थानिक गावकऱ्यांसह या कुटुंबाची भेट घेऊन परिस्थितीची चर्चा केली. “घडलेला प्रकार हा दुर्दैवी असून तो कोणालाच मान्य होण्यासारखा नाही,” असे सांगत त्यांनी सरकार या मुलाच्या पुढील उपचारासाठी आणि भविष्यासाठी सर्व आवश्यक ती मदत करेल, अशी ग्वाही दिली.