गोवा खबर : गोवा पोलिसांनी २०२५ मध्ये दोनापावला आणि म्हापसा परिसरात घडलेल्या दरोड्यांच्या गंभीर प्रकरणांचा मोठा उलगडा करत सहा आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे. २० एप्रिल २०२५ रोजी दोनापावला आणि ७ ऑक्टोबर २०२५ रोजी गणेशपुरी (म्हापसा) येथे घडलेल्या या दोन घटनांनी राज्यात खळबळ उडाली होती. या दोन्ही प्रकरणांचा गेल्या वर्षभरात सखोल तपास करून अखेर गुन्हेगारांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले.
तपासादरम्यान गोवा पोलिसांच्या उत्तर जिल्हा व क्राईम ब्रांचच्या पथकांनी देशभरात शोधमोहीम राबवली. बेलगाव, विजयपूर, बेंगळुरू, हैदराबाद, कोलकाता, दिल्ली, गुवाहाटी, त्रिपुरा आणि मेघालय या ठिकाणी जाऊन आरोपींचा मागोवा घेण्यात आला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गुप्तचर जाळ्याच्या मदतीने आरोपींची ओळख पटवण्यात आली. तपासात ही टोळी बांगलादेशातील बागरहाट जिल्ह्यातील असल्याचे स्पष्ट झाले.
दोनापावला दरोड्याच्या तपासात मुख्य आरोपी नूर इस्लाम उर्फ नदिम खान याला स्थानिक मदत करणारा महमूद याकूब याला ३० ऑक्टोबर २०२५ रोजी पणजी पोलिसांनी अटक केली होती. दोघेही पूर्वी कोलवाळ कारागृहात एकत्र होते आणि तेथेच त्यांच्यात ओळख झाली होती. म्हापसा प्रकरणात सैफुल इस्लाम याला आश्रय देणारे दोन आरोपी बेंगळुरूमधून अटक करण्यात आले होते. त्यानंतर जानेवारी २०२६ मध्ये दोन्ही प्रकरणांचा तपास क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आला.
गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ ते १५ एप्रिल २०२६ च्या दरम्यान दिल्ली क्राईम ब्रांचने या आरोपींना आणखी एक दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना अटक केली. त्यानंतर पाच आरोपींना ट्रान्सफर वॉरंटवर गोव्यात आणण्यात आले असून ३० एप्रिल रोजी त्यांना पणजी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना ११ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी बांगलादेशातील असल्यामुळे त्यांच्यावर ‘Foreigners Act 2025’ अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
प्राथमिक चौकशीत आरोपींनी भारत-बांगलादेश सीमेतून मेघालयमार्गे भारतात प्रवेश केल्याचे उघड झाले आहे. टोळीतील सदस्य आधीच गोव्यात येऊन घरांची रेकी करत होते. ते काही दिवस एकांत किंवा जंगल भागात थांबून घरातील लोकांची हालचाल, झोपेचे वेळापत्रक आणि घरात प्रवेशाचे मार्ग यांचा अभ्यास करत होते. संशय टाळण्यासाठी ते लहान गटांमध्ये विभागून काम करत होते आणि संपर्कासाठी कोणतीही तांत्रिक साधने वापरत नव्हते.
दरोड्याच्या वेळी आरोपी लोखंडी रॉड आणि चाकूंसारख्या शस्त्रांचा वापर करून घरातील सदस्यांना धमकावत, त्यांना बांधून ठेवत आणि त्यानंतर सोन्याचे दागिने व इतर मौल्यवान वस्तू लुटत होते. या प्रकरणात वापरलेली शस्त्रे आणि चोरीचा मुद्देमाल शोधण्याचे काम अजून सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
या संपूर्ण तपासात गोवा पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणावर समन्वयाने कारवाई करण्यात आली. क्राईम ब्रांचचे एसपी राहुल गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या गुन्ह्याचा उलगडा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.