Connect with us

गोवा खबर

पेडणे तालुका ‘टँकरमुक्त’ करणार; चांदेल येथील १५ एमएलडी अतिरिक्त जलप्रकल्पाचे उद्घाटन

Published

on

Spread the love

गोवा खबर : पेडणेवासीयांची तहान भागवण्यासाठी चांदेल येथील १५ एमएलडी (MLD) क्षमतेचा अतिरिक्त जलप्रकल्प मैलाचा दगड ठरणार आहे. या प्रकल्पामुळे भविष्यात पेडणेकरांना किमान आठ तास अखंडित पाणीपुरवठा करण्याचे सरकारचे उद्दिष्ट असून, संपूर्ण तालुका टँकरमुक्त करण्याचा आमचा मानस आहे, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री सुभाष फळदेसाई यांनी केले.

चांदेल येथे ३० कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या १५ एमएलडी अतिरिक्त पाणी प्रकल्पाचे उद्घाटन मंत्री फळदेसाई यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते.

आमदारांच्या पाठपुराव्याला यश

या प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित करताना मंत्री म्हणाले की, आमदार प्रवीण आर्लेकर आणि आमदार जीत आरोलकर यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळेच या प्रकल्पाला गती मिळाली. या प्रकल्पासाठी ज्यांनी आपल्या जमिनी दिल्या आहेत, त्यांचा त्याग मोठा असून त्यांना योग्य मोबदला दिला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

पाणी चोरी आणि नासाडीवर नियंत्रण

मंत्री फळदेसाई पुढे म्हणाले, “राज्यात सध्या २५% नागरिकांना २४ तास पाणी मिळते, हे प्रमाण ५०% पर्यंत नेण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मात्र, अनेक ठिकाणी पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होते किंवा चोरी होते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार कठोर पावले उचलत आहे. गोव्यात जगात सर्वात स्वस्त दरात पाणी उपलब्ध आहे, त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा.”

विरोधकांवर टीका आणि विकासाचा दावा

पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, माजी मंत्री निलेश काब्राल आणि मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या सहकार्यामुळे पेडणेची पाणी समस्या सोडवण्यात यश आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली ही समस्या चार वर्षांत मार्गी लागली आहे. “पूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी केवळ भाषणे दिली, पण प्रत्यक्षात विकासावर भर दिला नाही,” असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

उपस्थित मान्यवर

या सोहळ्याला आमदार प्रवीण आर्लेकर, चांदेल सरपंच बाळा शेटकर, तोरसे जिल्हा पंचायत सदस्य राघोबा कांबळी, मुख्य अभियंता विश्वंभर भेंडे, उपसरपंच रुचिरा मळीक, इब्रामपूर सरपंच अशोक धावुस्कर, सुबोध महाले, अभियंता रश्मी शिरोडकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन मोपा सरपंच सुबोध महाले यांनी केले, तर अभियंता विश्वंभर भट यांनी प्रकल्पाची तांत्रिक माहिती दिली.