Connect with us

गोवा खबर

लईराई जत्रोत्सवासाठी प्रशासन सज्ज; १८ एप्रिल रोजी रात्री होणार ‘मॉक ड्रिल’

Published

on

Spread the love

गोवा खबर : शिरगाव येथील प्रसिद्ध लईराई देवीच्या जत्रेसाठी अवघे काही दिवस उरले असून भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. उत्तर गोवा जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी काल शिरगाव येथे प्रत्यक्ष भेट देऊन तयारीचा सविस्तर आढावा घेतला. १८ एप्रिल रोजी रात्री प्रत्यक्ष ‘मॉक ड्रिल’ (सराव मोहीम) करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

गेल्या वर्षी घडलेल्या काही घटनांच्या पार्श्वभूमीवर यंदा विशेष खबरदारी घेतली जात आहे. गृह खात्याने जत्रा परिसरात कडक नियमावली लागू केली असून केवळ मर्यादित दुकानांनाच परवानगी दिली जाणार आहे. भाविकांसाठी स्वतंत्र दर्शन रांगा, पवित्र तळ्यातील स्नानाची सोय आणि होमकुंडाच्या दर्शनासाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी भाविकांना आवाहन केले आहे की, प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांचे पालन करावे आणि शिस्त पाळावी. यावेळी उपजिल्हाधिकारी शुभम नाईक, मामलेदार शैलेंद्र देसाई आणि देवस्थान समितीचे अध्यक्ष दीनानाथ गावकर उपस्थित होते. जत्रा शांततेत आणि सुरक्षित पार पाडण्यासाठी पोलीस दलाचा मोठा बंदोबस्त तैनात असेल.