Connect with us

गोवा खबर

विश्व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार यांच्या हस्ते ‘सुराज्य अभियाना’च्या वेबपेजचे लोकार्पण!

Published

on

Spread the love

गोवा खबर : देशातील प्रशासकीय त्रुटी, भ्रष्टाचार आणि सामान्य नागरिकांवर होणारा अन्याय दूर करून खऱ्या अर्थाने ‘सुराज्य’ स्थापन करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने सुरू केलेली ‘सुराज्य अभियान’ ही चळवळ आता डिजिटल स्वरूपात अधिक व्यापक होत आहे. या अभियानाचा परिचय देशभरात व्हावा आणि राष्ट्रप्रेमी नागरिकांना या कार्यात सक्रिय सहभागी करून घेता यावे, या उद्देशाने विकसित केलेल्या नवीन वेबपेजचे औपचारिक अनावरण विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता आलोक कुमार यांच्या शुभहस्ते नुकतेच संपन्न झाले.

वेबपेजची प्रमुख वैशिष्ट्ये आणि नागरिकांना मिळणारे लाभ !

१. तक्रार निवारण (Report an Issue) : भ्रष्टाचार किंवा प्रशासकीय दिरंगाईचा अनुभव आल्यास नागरिक या वेबपेजवर आपली तक्रार नोंदवू शकतात. या समस्यांविरुद्ध संविधानिक मार्गाने लढा देण्यासाठी तज्ज्ञांकडून कायदेशीर दिशादर्शन केले जाणार आहे.

२. थेट लोकसहभाग: सुरू असलेल्या विविध राष्ट्रीय मोहिमांमध्ये (Ongoing Campaigns) नागरिक घरबसल्या सहभागी होऊ शकतात. स्थानिक समस्यांविरुद्ध प्रशासकीय प्रक्रिया कशी सुरू करावी, याचे मार्गदर्शन येथे उपलब्ध आहे.

३. माहितीचा खजिना: अभियानाचे आजवरचे यश, महत्त्वपूर्ण न्यायालयीन लढे आणि आगामी उपक्रमांची सविस्तर माहिती यावर उपलब्ध असून, नागरिकांमध्ये कर्तव्याची जाणीव करून देणारे हे केंद्र ठरेल.

४. समन्वयकांशी संपर्क : संकेतस्थळावरील अर्ज भरताच समितीचे समन्वयक संबंधित व्यक्तीशी संपर्क साधतील, ज्यामुळे सुराज्य स्थापनेच्या कार्यात सामान्य नागरिकांना संघटितपणे कार्य करता येईल.

देशातील प्रत्येक जागरूक नागरिकाने या डिजिटल व्यासपीठाचा लाभ घेऊन आपल्या भागातील नागरी समस्या सोडवण्यासाठी आणि पारदर्शक प्रशासन आणण्यासाठी या चळवळीत योगदान द्यावे, असे आवाहन सुराज्य अभियानाच्या वतीने करण्यात आले आहे. या अभियानाशी जोडले जाण्यासाठी नागरिकांनी hindujagruti.org/surajya-abhiyan या लिंकला भेट द्यावी, असे समितीने पत्रकात म्हटले आहे.