गोवा खबर: फोंडा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार रितेश नाईक यांच्या नावाचा प्रस्ताव सर्वात आधी ‘मगोप’नेच मांडला होता, असा खुलासा मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी केला आहे. रितेश यांच्या उमेदवारीवरून विरोधकांकडून पसरवल्या जाणाऱ्या अफवांना त्यांनी पूर्णविराम दिला आहे.
युती धर्म पाळणार : ढवळीकर म्हणाले की, “सरकारमध्ये मगोप हा भाजपचा मित्रपक्ष आहे. रितेश नाईक यांचे नाव मी स्वतः पहिल्याच दिवशी सुचवले होते. जर आमच्या मनात काही शंका असती, तर आम्ही त्यांच्या नावाची शिफारस केली नसती. भाजपने आमचा शब्द पाळून रितेश यांना उमेदवारी दिली आहे, त्यामुळे मगोपचे कार्यकर्ते पूर्ण ताकदीने त्यांच्या प्रचारात उतरले आहेत.”
विरोधकांकडे दुर्लक्ष करा : पक्षात किंवा युतीत कोणतीही दुही नसल्याचे स्पष्ट करताना ढवळीकर यांनी कार्यकर्त्यांना विरोधकांच्या अफवांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन केले. “आमचे पाच महत्त्वाचे सदस्य सध्या निवडणूक क्षेत्रात सक्रिय आहेत. खांडेपार येथे कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांना स्पष्ट संदेश दिला आहे. आमचे मतदार भाजपच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडतील,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.