गोवा खबर : मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळावा, या मागणीसाठी मराठी राजभाषा निर्धार समिती आता आंदोलनाची तीव्रता वाढवणार आहे. यासाठी राज्यभर मेळावे आयोजित केले जाणार आहेत, अशी माहिती मराठी राजभाषा निर्धार समितीचे राज्य निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी दिली. यावेळी गो. रा. ढवळीकर, अशोक नाईक यांसह इतर सदस्य उपस्थित होते.
प्रा. वेलिंगकर म्हणाले, ‘समितीने वर्षभरात राज्यभर २० ठिकाणी मेळावे आयोजित केले होते. तसेच, विधानसभेत मराठी राजभाषेचा प्रश्न उपस्थित करण्यासाठी ३० आमदारांची भेट घेण्यात आली. सरकारी नोकरभरतीतून मराठीचे उच्चाटन होत असल्याच्या निषेधार्थ १६ ठिकाणी ‘निषेध धरणे’ आंदोलन करण्यात आले आहे. याशिवाय, १७ ठिकाणी मातृशक्ती मेळावे आणि १२ ठिकाणी युवाशक्ती मेळावे घेऊन जनजागृतीचा विस्तार करण्यात आला.
जनगणनेत मातृभाषा मराठी नोंदवा
मराठी राजभाषेसाठी भाजप नेत्यांशी चर्चेला प्रारंभ करण्यात आला असून, गोवा भाजप अध्यक्ष दामू नाईक यांची भेट घेण्यात आली आहे, असे सांगून वेलिंगकर म्हणाले की, आता आंदोलनाची तीव्रता वाढविली जाईल.चालू असलेल्या जनगणनेत सर्व मराठीप्रेमींनी आपली मातृभाषा मराठीत नोंदवावी, असे आवाहनही समितीने केले आहे.
असा आहे कार्यक्रम
एप्रिल-मे महिन्यात मिरवणुकांसह चार जाहीर सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, ११ एप्रिल रोजी म्हापसा (लोहिया उद्यान), १२ एप्रिल रोजी मडगाव (लोहिया मैदान), १ मे रोजी फोंडा (क्रांती मैदान) आणि ९ मे रोजी पणजी (आझाद मैदान) येथे सायंकाळी ३.३० वाजता सभा होणार आहे.
५ लाख लोकांच्या स्वाक्षरी घेणार
वेलिंगकर म्हणाले की, ‘स्वाक्षरी अभियान प्रारंभ’ या अभियानालाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत सुमारे दीड लाख स्वाक्षऱ्या संकलित करण्यात आल्या असून, ३० एप्रिल ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. एकूण ५ लाख स्वाक्षऱ्या गोळा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, राज्यातील १८ प्रखंडांमध्ये प्रत्येकी सुमारे ४० हजार स्वाक्षऱ्या संकलित करण्याचे नियोजन आहे. मे २०२६ मध्ये राष्ट्रपतींची भेट घेऊन या स्वाक्षऱ्या सादर करण्याचा समितीचा मानस आहे.