गोवा खबर : सर्वोच्च न्यायालयाने सर्व शैक्षणिक संस्थांना शाळांमध्ये मासिक पाळीच्या स्वच्छतेच्या सुविधां उपलब्ध करण्याबाबत निर्देश जारी केले आहेत अशी माहिती शिक्षण संचालनालयाने दिली आहे.
प्रत्येक शाळेत वापरण्यायोग्य पाण्याची सोय असलेली चालू स्थितीत, मुले व मुलींसाठी वेगळी शौचालये असली पाहिजेत. शाळेतील शौचालयांमध्ये हात धुण्याची सुविधा, साबण आणि पाणी नेहमीच उपलब्ध असले पाहिजे. शिवाय, प्रत्येक शाळेने एएसटीएम डी-६९५४ मानकांनुसार तयार केलेले ऑक्सो-बायोडिग्रेडेबल सॅनिटरी नॅपकिन्स मोफत पुरवावेत. असे सॅनिटरी नॅपकिन्स मुलींसाठी, शक्यतो शौचालयाच्या आवारात सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीनद्वारे किंवा जिथे अशी सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन लवकर बसविणे शक्य नाही, तेथे ठराविक ठिकाणी किंवा शाळेतील नियुक्त अधिकाऱ्यांव्दारे, सहजपणे उपलब्ध करून द्यावीत.
त्याचप्रमाणे प्रत्येक शाळेने मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापन कॉर्नर स्थापित केले पाहिजेत. अशा मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापन कॉर्नरमध्ये मासिक पाळीशी संबंधित गरजा पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त आतील कपडे, अतिरिक्त गणवेश, डिस्पोजेबल बॅग आणि इतर आवश्यक साहित्य समाविष्ट असले पाहिजे आणि प्रत्येक शौचालय जागेत स्वच्छताविषयक साहित्य गोळा करण्यासाठी झाकलेला कचरापेटी असाव्या आणि अशा डब्यांची स्वच्छता आणि नियमित देखभाल नेहमीच केली पाहिजे.
म्हणूनच राज्यातील सर्व शाळा व्यवस्थापनांना आमच्या विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि स्वच्छतेसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्याचे आदेश देण्यात येत आहेत.