गोवा खबर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जन्मोत्सवानिमित्त, सांगे येथे आयोजित एका भव्य सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील शिवाजी महाराजांच्या सर्वात उंच स्मारकाचे अनावरण केले. यावेळी गोवा आध्यात्मिक महोत्सवाचा देखील शुभारंभ करण्यात आला.

या ऐतिहासिक प्रसंगी ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी, जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर आणि कृषी मंत्री सुभाष फळदेसाई उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, हे स्मारक केवळ दगड-मातीचे नसून ते स्वराज्य आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहे. पोर्तुगीज राजवटीत नष्ट होणाऱ्या गोव्याच्या संस्कृतीचे आणि मंदिरांचे रक्षण शिवरायांनीच केले, याची आठवण त्यांनी करून दिली.
सांगे येथील हिंदू आणि ख्रिश्चन बांधवांनी एकत्र येऊन नेहरू पार्क येथे हा पुतळा उभारण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल स्थानिक नेत्यांनी त्यांचे कौतुक केले. हा सोहळा गोव्याच्या एकतेचे दर्शन घडवणारा ठरला.