गोवा खबर : दाबोळी येथील जुने गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ दोन ते तीन दिवसांत बंद करण्याचे आदेश केंद्र सरकारकडून जारी होण्याची शक्यता असल्याचा गंभीर दावा काँग्रेसच्या दक्षिण गोवा खासदारांनी केला आहे. काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
खासदारांनी सांगितले की, दाबोळी विमानतळाबाबत सरकारकडून जाणीवपूर्वक अस्पष्टता ठेवली जात असून या निर्णयाचा थेट फटका गोव्याच्या अर्थव्यवस्थेला, पर्यटन उद्योगाला तसेच हजारो स्थानिकांच्या रोजगारावर बसणार आहे. सरकारने या विषयावर जनतेला स्पष्ट माहिती देणे गरजेचे असतानाही अद्याप कोणतीही ठोस भूमिका जाहीर केलेली नाही, असा आरोप त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, दाबोळी आणि मोपा हे दोन्ही विमानतळ एकत्रितपणे कार्यरत राहावेत, अशी गोव्याची गरज आहे. मात्र सध्याची धोरणे पाहता दाबोळी विमानतळ हळूहळू दुर्लक्षित केला जात असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. मोपा विमानतळ चालवणाऱ्या खासगी कंपनीच्या आर्थिक हितासाठी दाबोळी विमानतळ बंद करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
खासदारांच्या म्हणण्यानुसार, मोपा विमानतळ चालवणाऱ्या कंपनीवर मोठ्या प्रमाणात आर्थिक दायित्व असून ते भरून काढण्यासाठी दाबोळी विमानतळ बंद करून सर्व वाहतूक मोपाकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. केंद्र सरकारकडून या कंपनीला अप्रत्यक्ष मदत केली जात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.
दाबोळी विमानतळ केवळ वाहतूक केंद्र नसून तो गोव्याच्या पर्यटन, व्यापार, संरक्षण आणि स्थानिक रोजगाराचा महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना केवळ आर्थिक नव्हे तर सामाजिक आणि राज्यहिताचा विचार होणे आवश्यक आहे. दाबोळी विमानतळ बंद करण्याचा निर्णय घेतल्यास काँग्रेस त्याविरोधात तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही त्यांनी दिला.