Connect with us

गोवा खबर

ईएमसी, तुये येथे सरकारी विभागांसोबत आढावा बैठकीचे आयोजन

Published

on

Spread the love

गोवा खबर : माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन्स विभाग (डीआयटीईएण्डसी) यांनी तुये येथील इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर (ईएमसी) येथे पायाभूत सुविधांची प्रगती तपासण्यासाठी आणि कार्यान्वयन तयारी अधिक सक्षम करण्यासाठी आढावा बैठक घेतली. विविध सरकारी विभागांच्या प्रमुख प्रतिनिधींच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली, ज्यातून प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी शासनाची समन्वयात्मक बांधिलकी दिसून आली.

ही आढावा बैठक डीआयटीईएण्डसीचे संचालक कबीर शिरगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यांच्यासोबत संयुक्त संचालक डॉ. मिलिंद साखरदांडे, सहाय्यक संचालक एल्ड्रिडा क्रास्टो तसेच गोवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (जीआयटीडीसी), इन्फोटेक कॉर्पोरेशन ऑफ गोवा (आयटीजी), उपजिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी कार्यालय, पेडणे, सार्वजनिक बांधकाम खाते (साबांखा), गोवा पोलीस आणि अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालयाचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीदरम्यान ईएमसी पार्कमधील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये प्रवेश रस्ता, पाणी व वीजपुरवठा, अग्निसुरक्षा व्यवस्था आणि इंटरनेट सेवा यांचा समावेश होता.

प्रवेश रस्त्यासाठी आवश्यक जमीन संपादनाची स्थिती तपासण्यात आली आणि कामकाज सुरळीतपणे पुढे जाण्यासाठी संबंधित यंत्रणांशी पुढील कार्यवाहीवर चर्चा करण्यात आली.

साबांखाकडून सांगण्यात आले की अग्निशमन ब्लॉकसाठी पाणीपुरवठ्याची कामे अंतिम टप्प्यात आहेत, तर अखंड वीजपुरवठ्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच ईएनसी पार्कमधील वाढत्या वापराच्या पार्श्वभूमीवर मोबाईल नेटवर्क सुधारण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले. कार्यान्वयन तयारी अधिक बळकट करण्यासाठी अग्निशमन व पोलीस विभागांना कामाच्या ठिकाणी मनुष्यबळ तैनात करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

डीआयटीईएण्डसीचे संचालक कबीर शिरगांवकर यांनी जीआयटीडीसीच्या अधिकाऱ्यांसह वेअरहाऊस आणि कचरा प्रक्रिया इमारतीसह सुरू असलेल्या पायाभूत कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. औद्योगिक प्लॉट्स आणि एमआयझेड प्लॉट्स, जिथे बांधकाम सुरू झाले आहे, त्यांचाही आढावा घेण्यात आला, ज्यातून ईएमसी पार्कमधील कामांची सातत्यपूर्ण प्रगती दिसून आली.

बैठकीचा समारोप विभागांमधील समन्वय अधिक मजबूत ठेवणे आणि उर्वरित सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर देत करण्यात आला. तुये ईएनसीला होणाऱ्या मंत्री रोहन खंवटे यांच्या नियोजित भेटीपूर्वी ही तयारी बैठक घेण्यात आली असून, क्लस्टरच्या विकासाला गती देण्यासाठी विभागाची सक्रिय भूमिका अधोरेखित झाली.