Connect with us

गोवा खबर

राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांना राजभवनात आयोजित कार्यक्रमात निरोप

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोव्याचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांना आज 24 जुलै रोजी दोना पावला येथील राजभवनाच्या न्यू दरबार हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात  निरोप देण्यात आला. गोव्याचे राज्यपाल म्हणून त्यांनी चार वर्ष काम केले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत; केंद्रीय उर्जा, नवीन आणि अक्षय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक आणि गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते आर्थिक मदत वितरणही करण्यात आले.  

उपस्थितांना संबोधित करताना पी एस श्रीधरन पिल्लई म्हणाले, गोव्याचे राज्यपाल म्हणून आपल्या कारकिर्दीत राज्यातील जनतेचे आणि सरकारचे  पूर्ण सहकार्य  मिळाले. राजभवनाने राबवलेले सर्व उपक्रम पूर्ण करण्यास मदत केल्याबद्दल राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांचे विशेष आभार मानले.

याप्रसंगी मुख्यमंत्री म्हणाले, राज्यपालांनी गोव्यातील जनतेसाठी राजभवनाचा  प्रवेश  सुलभ केला आहे. प्रभावीपणे प्रशासन चालवण्यासाठी राजभवनाने दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी राज्यपालांचे आभार मानले.

राज्यपालांनी त्यांच्या कार्यकाळात गोव्यातील लोकांशी एक नाते निर्माण केले. ते गोव्याचे खरेखुरे मार्गदर्शक होते. राजभवनात येणाऱ्यांना घरासारखे वाटावे, याकडे त्यांनी लक्ष दिले, असे श्रीपाद नाईक म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की पिल्लई यांच्या कार्यकाळात डायलिसिस  आणि कर्करुग्णांना राजभवनाने दिलेल्या उदार मदतीमुळे अनेक गोवेकरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.

या कार्यक्रमात राज्यपालांनी आपल्या स्वेच्छाधीन निधीतून 38 कर्करोग आणि डायलिसिस रुग्णांना आर्थिक मदतीचे वाटप केले. रुग्णांव्यतिरिक्त गोव्यातील विविध संस्था, संघटना आणि मठांना लोककल्याणासाठी आर्थिक मदत देण्यात आली.

राज्यपालांचे सचिव संजीव गावस देसाई; राज्यपालांचे विशेष अधिकारी आर. मिहिर वर्धन आणि गोवा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. एच. बी. मेनन, राज्य आणि केंद्र सरकारच्या विभागांचे इतर वरिष्ठ अधिकारी या प्रसंगी उपस्थित होते. गोव्याच्या प्रथम महिला रीता श्रीधरन पिल्लई यांच्यासह  राजभवनातील अधिकारी आणि कर्मचारीही या समारंभाला  उपस्थित होते.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी श्रीधरन पिल्लई यांच्यानंतर पुसापती अशोक गजपती राजू यांची गोव्याचे नवीन राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्याची घोषणा 14 जुलै 2025 रोजी केली आहे.