Connect with us

गोवा खबर

‘वाघेरी’ संरक्षित वनक्षेत्र घोषित होणार!

Published

on

Spread the love
  • बेकायदेशीर बांधकामांना मुभा नाही : वनमंत्री विश्वजित राणे यांचा इशारा

गोवा खबर : सत्तरी तालुक्यातील ‘वाघेरी’ डोंगर लवकरच संरक्षित वनक्षेत्र म्हणून घोषित केला जाईल किंवा अभयारण्यात समाविष्ट केला जाईल, अशी माहिती वनमंत्री विश्वजित राणे यांनी दिली. कोणतीही अनधिकृत बांधकामे किंवा बेकायदेशीर कृती खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.

वनविषयक उच्चस्तरीय बैठकीत त्यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. प्रधान मुख्य वनपाल कमल दत्ता, सल्लागार फ्रेजल आरावजो व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मगरींची गणना व हॉटस्पॉट शोध

दाबाळ येथे महिलेवर मगरीने केलेल्या हल्ल्यानंतर राज्यातील जलस्रोतांमध्ये असलेल्या मगरींची गणना करण्यात येणार आहे. या ठिकाणी विशेष सर्वेक्षण व मॅपिंग करून हॉटस्पॉट ओळखले जातील आणि त्यानुसार उपाययोजना केल्या जातील.

वखारींचे ऑडिट आणि खारफुटी संवर्धन

राज्यातील लाकूड आणणाऱ्या वखारींचे ऑडिट केले जाणार असून ३५५० हेक्टर क्षेत्र खारफुटी राखीव क्षेत्र म्हणून घोषित केले जाईल. तसेच खासगी वनक्षेत्रातील ४८० दावे प्रलंबित असून त्यांची तपासणी चार महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

व्हर्टिकल फॉरेस्ट आता सक्तीचे

२५० किंवा अधिक एफएसआय असलेल्या उंच इमारतींसाठी ‘व्हर्टिकल फॉरेस्ट’ ही संकल्पना अनिवार्य असेल. यासाठी अधिवास दाखला केवळ निकष पूर्ण केल्यासच दिला जाणार आहे. वन, नगरविकास व नगरनियोजन खात्यांनी यासाठी नियम आखले असून इमारतीभोवती वृक्ष लागवड बंधनकारक आहे.