Connect with us

गोवा खबर

सिकलसेल तसेच जनुकीय आजारावर अधिकाधिक संशोधन करण्याची गरज

Published

on

Spread the love
  • महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचे आवाहन

 

गोवा खबर : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था – एम्स नागपूर येथून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी जनुकीय आजार तसेच स्टेम सेल आणि वृद्धत्वा संबंधातील आजारांवर अधिक संशोधन करून आपल्या उपचारात्मक पद्धती त्या दिशेने आखल्या पाहिजेत, असे आवाहन राज्यपाल सी .पी . राधाकृष्णन यांनी आज नागपूर येथे केले.

2018 मध्ये नागपूरच्या जीएमसी (शासकीय वैदकीय महाविद्यालय) येथून सुरू झालेल्या एम्स नागपूरच्या वर्धा रोडवरील मिहान येथील कॅम्पसमध्ये आयोजित या संस्थेच्या पहिल्या दीक्षांत समारंभाला संबोधित करताना ते बोलत होते . याप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी ,एम्स नागपूरचे अध्यक्ष डॉ . अनंत पंढरे , कार्यकारी संचालक डॉ . प्रशांत जोशी उपस्थित होते.

पूर्वी फक्त दिल्लीमध्येच एम्स होते परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून एम्स आता तामिळनाडू , झारखंड यासारख्या राज्यासह नागपूर आणि अनेक शहरात स्थापन झाले असून दिल्लीच्या एम्स मध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना तसेच सहाय्यकांना निवासाची सोय मिळावी म्हणून शेल्टर हॉल सुद्धा निर्माण करण्यात आले आहे अशी माहिती राज्यपालांनी यावेळी दिली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एम्समध्ये हृदय ,यकृत तसेच अवयव प्रत्यारोपणाबाबत आणि पूर्व विदर्भात प्रामुख्याने असणाऱ्या थॅलसेमिया आणि सिकलसेल ऍनिमिया यावर अत्याधुनिक उपचार एम्स नागपूमध्ये उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगितले .बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन सारख्या शस्त्रक्रियांना देखील महाराष्ट्र शासनाच्या योजनेतून एम्समध्ये सवलत मिळावी यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच वैद्यकीय क्षेत्रामध्ये खाजगी सार्वजनिक भागीदारीने गुंतवणूक मोठ्या प्रमाणात येऊ शकते असे देखील त्यांनी नमूद केले.

एम्स नागपूरच्या पहिल्या दीक्षांत समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले. त्यांनी सांगितले की 2018 मध्ये एम्स नागपूरला मिहान येथे 200 एकर जमीन महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिली होती .गेल्या 6 वर्षात एम्स नागपूरने भारताच्या आरोग्य क्षेत्रामध्ये एक महत्वाची भूमिका बजावली आहे .

या कार्यक्रमाला एम्सचे शिक्षक ,अधिकारी त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते .