गोवा खबर : आंतरराष्ट्रीय योग दिवस 2025 ला 100 दिवस उरले आहेत (काऊंटडाऊन). त्या निमित्ताने आयोजित केल्या जाणाऱ्या उपक्रमांचा भाग म्हणून लेह येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोवा-रिग्पा (एनआयएसआर), या सोवा-रिग्पाचे जतन, संवर्धन आणि विकासाकरता आयुष मंत्रालयांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या स्वायत्त संस्थेने, 25 मार्च रोजी लेह येथे संस्थेच्या कॅम्पसमध्ये योग साधनेवरील विशेष कार्यक्रम आयोजित केला होता.
हिमालयाच्या भव्य पार्श्वभूमीवर, 11,562 फूट (3,524 मीटर) उंचीवर, एनआयएसआरचे कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या टीमने आयुष मंत्रालयाच्या मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेने विकसित केलेल्या कॉमन योगा प्रोटोकॉल (सीवायपी) अनुसार, योग सत्र आयोजित केले होते.

(नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोवा-रिग्पा, एनआयएसआरच्या कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी योग सत्राचे आयोजन केले)
बर्फाच्छादित शिखरे, थंड बोचरी हवा आणि वातावरणात भरून राहिलेल्या निरामय शांततेची अनुभूती यांची पार्श्वभूमी लाभलेल्या निसर्गरम्य लेहने या कार्यक्रमासाठी परिपूर्ण मंच निर्माण केला.
आंतरराष्ट्रीय योग दिन – 2025 च्या 100 दिवसांच्या काऊंटडाऊनचे उद्घाटन आयुष मंत्रालय (स्वतंत्र प्रभार) राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे आयोजित ‘योग महोत्सव- 2025’ दरम्यान करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान आयुष मंत्र्यांनी माहिती दिली होती की, या जागतिक उपक्रमाच्या अकराव्या वर्षाचे औचित्य साधून, यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित उपक्रम, पुढील 10 आगळ्या कार्यक्रमांवर लक्ष केंद्रित करतील:
- योग संगम: 10,000 ठिकाणी एकत्रित योग प्रात्यक्षिके आयोजित करून जागतिक विक्रम नोंदवणे.
- योगबंधन: ऐतिहासिक स्थळांवर योग सत्रे आयोजित करण्यासाठी 10 देशांबरोबर जागतिक भागीदारी.
- योग पार्क: दीर्घकालीन सामुदायिक सहभागासाठी एक हजार योग पार्क विकसित करणे.
- योग समावेश: दिव्यांगजन, ज्येष्ठ नागरिक, बालके आणि वंचित गटांसाठी योग साधनेवरील विशेष कार्यक्रम.
- योग प्रभाव: योग साधनेच्या सार्वजनिक आरोग्यावरील गेल्या दशकभरातील प्रभावाचे मूल्यांकन.
- योग कनेक्ट: ख्यातनाम योग साधना तज्ञ आणि आरोग्य सेवा व्यावसायिकांचा समावेश असलेली आभासी योग परिषद.
- हरित योग: वृक्षारोपण आणि स्वच्छता मोहिमेबरोबर योगाभ्यासाची सांगड घालणारा शाश्वततेवर आधारित उपक्रम.
- योग अनप्लग्ड: तरुणांना योग साधनेकडे आकर्षित करणारा कार्यक्रम.
- योग महाकुंभ: आठवडाभर 10 ठिकाणी चालणारा उत्सव, ज्याची सांगता पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली आयोजित मध्यवर्ती उत्सवामध्ये होईल.
- संयोगम्: सर्वांगीण आरोग्यासाठी योग साधनेला आधुनिक आरोग्यसेवेशी जोडणारा 100 दिवसांचा उपक्रम.