Connect with us

गोवा खबर

राज्यपालांच्या हस्ते कर्करोग, डायलिसिस रुग्णांना आर्थिक मदतीचे वितरण

Published

on

Spread the love

गोवा खबर : राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी राजभवनातील दरबार सभागृहात आयोजित कार्यक्रमात कर्करोग आणि डायलिसिस रुग्णांना आर्थिक मदतीचे वाटप केले. मानवतेची सेवा हीच ईश्वराची सेवा आहे असे म्हटले जाते, मानव म्हणून, दुःखात असलेल्या आणि दुःखात जगणाऱ्या लोकांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे, असे राज्यपालांनी सांगितले.    

राज्यपालांनी त्यांच्या निधीतून आर्थिक मदत वितरीत केली. यावेळी त्यांनी सुमारे ३७ लाभार्थ्यांना प्रत्येकी २५००० रुपयांचे आर्थिक मदतीचे धनादेश सुपूर्द केले.

राज्यपालांनी गोव्याचे राज्यपाल असताना त्यांनी गोव्यातील प्रत्येक गावात फिरून कर्करोग आणि मधुमेहासारख्या आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांना भेटल्याचे सांगितले. हे लोक गंभीर उपचार घेत आहेत आणि त्यांना अनेकदा मदतीची आवश्यकता असते असे ते म्हणाले. राज्यपालांनी देण्यात येणारी मदत ही तुटपुंजी आहे परंतु त्यामुळे त्यांच्या उपचारांचा खर्च भागविण्यास मदत होईल अशी आशा व्यक्त केली. त्यांनी लाभार्थ्यांना आजारावर मात करण्यासाठी आत्मविश्वास आणि मनोबल मजबूत ठेवण्याचा सल्ला दिला.

मानवतेच्या सेवेसाठी चॅरीटी संस्थांचे कौतुक करून राज्यपालांनी राज्यभरातील विविध चॅरीटी संस्थांना राजभवनच्या निधीतून एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली असल्याचे सांगितले.

राज्यपालांचे सचिव  एमआरएम राव, आयएएस यांनी यावेळी बोलताना पिल्लई यांनी गोव्यात सर्वत्र प्रवास केला असून चॅरीटी संस्थांनाही भेटी दिल्या आहेत, असे सांगितले. भेटींदरम्यान त्यांनी सामान्य लोकांशी व पुनर्वसन केंद्रांमधील लोकांशीही संवाद साधला आहे याव्दारे मानवतेबद्दल त्यांची काळजी दिसून येते. आज देण्यात आलेली आर्थिक मदत राज्यपालांच्या निधीतून देण्यात आली आहे असेही त्यांनी सांगितले.

राज्यपालांचे अतिरिक्त सचिव संजीव गांवस देसाई, लाभार्थ्यांचे नातेवाईक, राजभवनाचे कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.