Connect with us

गोवा खबर

दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीच्या अद्ययावत गस्ती नौकांच्या बांधणी प्रक्रियेचा प्रारंभ

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोवा शिपयार्ड लिमिटेड (जीएसएल) द्वारे बांधल्या जाणाऱ्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीच्या अद्ययावत  अपतटीय गस्ती नौकांची (एनजीओपीव्ही) नौकातल भरणी अर्थात जहाज बांधणी प्रक्रियेचा प्रारंभ करण्याचा समारंभ 23 मार्च 2025 रोजी रत्नागिरीतील मेसर्स योमन मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (वायएमएसपीएल) येथे आयोजित करण्यात आला होता.

अशा 11 गस्ती जहाजांच्या संरचना आणि बांधणीसाठी संरक्षण मंत्रालय आणि मेसर्स गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स (जीआरएसई), कोलकाता आणि गोवा येथील जीएसएल यांच्यात 30 मार्च 2023 रोजी करार झाले. त्यानुसार सुरुवातीला सात नौका मेसर्स गोवा शिपयार्ड लिमिटेड’ने तर चार नौका जीआरएसई’ने बांधायच्या आहेत.

जीएसएलच्या बांधकामाच्या धोरणाचा एक भाग म्हणून यार्ड 1281 आणि यार्ड 1282 चे मुख्य हल ब्लॉक रत्नागिरी येथील वायएमएसपीएलच्या परिसरात तयार केले जातील. दोन्ही जहाजांचा नौकातल भरणी समारंभ रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला व्हाइस ऍडमिरल आर स्वामीनाथन, नियंत्रक युद्धनौका उत्पादन आणि अधिग्रहण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी भारतीय नौदल, मेसर्स जीएसएल आणि मेसर्स वायएमएसपीएलचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

सुमारे 3000 टन वजनाचे एनजीओपीव्ही तटीय संरक्षण आणि देखरेख, शोध आणि बचाव कार्य, अपतटीय मालमत्तेचे संरक्षण आणि चाचेगिरीविरोधी मोहिमांसाठी आरेखित केलेले आहेत. या जहाजांची नौकातल भरणी या प्रकल्पाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. 11 एनजीओपीव्ही’ची निर्मिती ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’ या देशाच्या दृष्टिकोनाशी सुसंगती साधत केली जात आहे. या नौका भारतीय नौदलाच्या सागरी पराक्रमाला चालना देण्यासाठी सज्ज आहेत.