Crime:ड्रग्स बाळगल्या प्रकरणी कळंगुट मध्ये नायजेरियनास अटक

0
938

गोवा खबर:दीड लाख रूपयांचे ड्रग्स बाळगल्या प्रकरणी कळंगुट पोलिसांनी एका नायजेरियनास अटक केली. तो वापरत असलेली स्कूटर देखील पोलिसांनी जप्त केली आहे.
परोबवाडो येथील एका रेस्टोरेन्ट कडे जॉय एनझेमा हा 31 वर्षीय तरुण ग्राहकांना देण्यासाठी ड्रग्स घेऊन येणार असल्याची माहिती कळंगुट पोलिसांना मिळाली होती.त्यानंतर लागलीच पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचण्यात आला.एका स्कूटर वरुन जॉय हा ड्रग्स विकण्यासाठी आला असता खाजगी कार मधून येऊन दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र जॉयने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला जेरबंद करण्यात यश मिळवले. पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी जॉयने झटापट केली मात्र त्याची डाळ शिजू शकली नाही.
दळवी आणि त्यांच्या टीमने त्याची चौकशी केली असता त्याने आपल्याकडे ड्रग्स असल्याचे कबूल केले. त्याची झडती घेतली असता त्याच्या कडून 30 हजार रूपयांचा गांजा आणि 1 लाख 20 हजार रूपयांचा चरस त्याच्याकडे सापडला. पोलिसांनी त्याच्या कडून GA-03-AE-0515 क्रमांकाची दुचाकी देखील जप्त केली. ही कारवाई काल रात्री 10 ते 12 च्या दरम्यान करण्यात आली.या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक ऋषिकेश पाटील, सीताराम मळीक पोलिस कॉन्स्टेबल दिनेश मोरजकर,गोविंद शिरोडकर,वल्लभ पेडणेकर आणि विनोद केरकर यांनी भाग घेतला.उपविभागीय पोलिस अधिकारी किरण पडूवाल आणि पोलिस अधीक्षक चंदन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.