Connect with us

गोवा खबर

गोव्यातील महिला आणि मुलांना सुरक्षा देण्यात सरकार अपयशी: प्रतिमा कुतिन्हो

Published

on

Spread the love
गोवा खबर:आम आदमी पक्षाच्या उपाध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांनी उत्तर गोव्यातील चार वर्षांच्या मुलीवर झालेल्या बलात्काराबाबत शोक व्यक्त केले असून अशा घटना रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. 
पक्षाच्या पणजी कार्यालयात पत्रकार परिषदेला संबोधित करताना कुतिन्हो म्हणाल्या, “एका आठवड्यातच तीन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून राज्यात विशेषत: अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. असे असताना गेल्या दहा वर्षांपासून राज्यात सत्ताधारी असलेले भाजप सरकार मात्र असले क्रूर कृत्य रोखण्यात अपयशी ठरले आहेत. यावरून महिलांवरील वाढत्या गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी भाजप सरकारकडे दृष्टीकोन नसल्याचे स्पष्ट झाले आहे”.
राज्यातील वाढत्या बलात्कारांच्या संख्येबद्दल चिंतित असलेल्या कुतिन्हो यांनी इयत्ता पाचवीपासून सर्व शाळांमध्ये लैंगिक शिक्षण अनिवार्य करण्याची मागणी केली आहे.
‘नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो – 2020’ च्या अहवालात असे दिसून आले आहे की राज्यातील बलात्कार पीडितांपैकी 66% पेक्षा जास्त अल्पवयीन आहेत. 2020 वर्षात राज्यात दरमहा सरासरी पाच बलात्काराच्या घटनांची नोंद झाल्याचेही आकडेवारीवरून समोर आले आहे. गोव्यात बलात्काराचे प्रमाण ७.८% आहे, जे राष्ट्रीय सरासरी ४.३% पेक्षा जास्त आहे, असे कुतिन्हो यांनी सांगितले.
कोरोनामुळे शिक्षण ऑनलाईन झाल्याने सर्व मुलांच्या हातात आता मोबाईल आले आहे. यामुळे सध्या लैंगिक शिक्षण अधिकाधिक महत्त्वाचे झाले आहे. जेव्हा मुलांना योग्य लैंगिक शिक्षण मिळते तेव्हा त्यांच्या मनातील गैरसमज दूर होऊन ते गोष्टींकडे अधिक विचारपूर्वक पाहतात, असे कुतिन्हो यांनी सांगितले.
गेल्या आठवड्यात उत्तर गोव्यातील एका खासगी हॉटेलमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी कॉन्स्टेबल मंजुनाथ कोळी याला अटक केली होती. चौकशीअंती समोर आले की, कॉन्स्टेबल अल्पवयीन मुलीचा मित्र असून एका खासगी हॉटेलमध्ये त्यांनी अनेकदा शारीरिक संबंध ठेवले होते. कोळी याने आपल्या पत्नीला अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून गर्भपात करण्यास पटवून देण्यास सांगितले असल्याचे वृत्त आहे. पत्नीने मुलीला उत्तर गोव्यातील एका खासगी रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी काही औषधे लिहून दिली आणि गर्भपात केला.
दुसऱ्या एका घटनेत चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाला. आईने सांगितले की, ती कामानिमित्त बाहेर गेली होती, तेव्हा तिने तिच्या मुलीला एका मैत्रिणीकडे ठेवले होते. घरी परतल्यावर आपल्या मुलीने फक्त टी-शर्ट आणि डायपर घातलेला पाहून तिला धक्काच बसला.
यावर बोलताना कुतिन्हो म्हणाल्या, “गुन्हेगारांच्या मनात कोणतीही भीती नसल्यामुळे आज अशा दुर्दैवी घटना घडत आहेत. भाजप सरकारने अशा गुन्हेगारांवर कठोर पावले उचलण्याची वेळ आली आहे. यामुळे एक मजबूत संदेश पाठविला जाईल. त्याशिवाय, सरकारने पीडित आणि आरोपी दोघांसाठी समुपदेशन सत्र आयोजित केले पाहिजे.

Continue Reading