गोवा खबर:भाजपा सरकारला विनाअट पाठिंबा देणाऱ्या मगो नेते सुदिन ढवळीकर यांच्याकडे वीज या मोठ्या खात्यासह गृह निर्माण खाते सोपवण्यात आले आहे.उर्वरित 3 मंत्र्यांची खाती आज जाहिर करण्यात आली त्यात ढवळीकर यांची पॉवर वीज खाते देऊन कायम ठेवण्यात आली आहे.
भाजपाचे थिवीचे आमदार नीळकंठ हळर्णकर यांच्याकडे मच्छिमार, पशुसंवर्धन आणि कारखाने व बाष्पक तर सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई यांच्याकडे समाज कल्याण, नदी परिवहन आणि पुराभीलेख खात्याचा कारभार सोपवण्यात आलाआहे.
वजनदार मानल्या जाणाऱ्या वीज आणि समाजकल्याण खाती कुणाला मिळणार याची राज्यात सर्वांना उत्सुकता होती.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्वतःकडे महत्त्वाची अर्थात वजनदार खाती म्हणजेच गृह, अर्थ, खाण, दक्षता, शिक्षण ही खाती ठेवली आहेत.
मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात 28 मार्च रोजी झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्र्यांसह नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. यात विश्वजीत राणे, माविन गुदिन्हो, रवी नाईक, सुभाष शिरोडकर, गोविंद गावडे, बाबूश मोन्सेरात, रोहन खंवटे, नीलेश काब्राल यांचा समावेश होता. त्यांना 3 एप्रिल रोजी खात्यांचे वाटप करण्यात आले होते. तर 9 एप्रिल रोजी आणखी 3 आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. यात मगोपचे सुदिन ढवळीकर तर भाजपच्या नीळकंठ हळर्णकर आणि सुभाष फळदेसाई यांचा समावेश होता. या तीन मंत्र्यांना आज खात्यांचे वाटप करण्यात आले.