– चिदंबरम यांनी तरुण पिढीला जबाबदारी घेण्याचे केले आवाहन
– व्हायब्रंट विरोधी पक्ष म्हणून काम करू : पाटकर
गोवा खबर: गोव्यातील जनतेचा नेहमीच आवाज बनून राहणार असे आश्वासन देत काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते मायकल लोबो यांनी सोमवारी सांगितले की, लोकांचे प्रश्न मांडण्याबरोबरच पक्षाचे पुनरुज्जीवन करुन लोकांचा विश्वास पुन्हा मिळवून ध्येय साध्य केले जाईल.
अमित पाटकर यांची गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर लोबो बोलत होते. गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे नवनियुक्त अध्यक्ष अमित पाटकर, कार्याध्यक्ष युरी आलेमाव, जिल्हाध्यक्ष वीरेन शिरोडकर आणि सावियो डिसिल्वा यांचा पदभार सोहळा सोमवारी मिरामार येथे पार पडला.
एआयसीसीचे वरिष्ठ निरीक्षक पी. चिदंबरम, एआयसीसीचे प्रभारी दिनेश गुंडू राव, मायकेल लोबो, दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन, माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, कार्याध्यक्ष व आमदार युरी आलेमाव, आमदार आलेक्स सिक्वेरा, माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर, प्रकाश राठोड आदी उपस्थित होते. तसेच ॲड. रमाकांत खलप, युवा अध्यक्ष ॲड . वरद म्हार्दोळकर, महिला अध्यक्षा बिना नाईक यांच्यासह काँग्रेसचे नेते यावेळी उपस्थित होते.
मायकल लोबो म्हणाले की, गोव्यातील लोकांना बदल हवा होता कारण त्यांना त्यांचे ऐकणारे सरकार हवे होते. “पण मतांच्या विभाजनामुळे हे होऊ शकले नाही. निकालानंतर लोकांना त्यांचा ‘निर्णय’ कळला.” असे लोबो म्हणाले.
काँग्रेस सोडून ‘नवी पहाट’मध्ये सामील झालेल्यांना पुन्हा पक्षात आणून काँग्रेसला मजबूत बनवावे लागेल, असे लोबो म्हणाले.
“आम्ही आमचे गट मजबूत बनवण्यावर आणि आमच्या कृती पुनरुज्जीवित करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. भविष्यात आम्हाला आव्हानांना सामोरे जावे लागेल आणि पंचायत आणि लोकसभा निवडणुकीत आम्हाला स्वतःला सिद्ध करावे लागेल.” असे ते म्हणाले.
ते म्हणाले की, गोव्यात अनेक प्रश्न आहेत, ते विधानसभेत आणि सर्व व्यासपीठांवर मांडण्याची गरज आहे. “आपण चाळीसही गटांचे पुनरुज्जीवन करूया. चला एक नवीन सुरुवात करूया.” असे लोबो म्हणाले.
“लोकांना आता कळले आहे की, वेगळ्या दिशेने मतदान केले तर भाजपची सत्ता येते. असे पुन्हा होऊ नये.” असे ते म्हणाले.
पाटकर म्हणाले की, लोकांपर्यंत पोहोचण्याचा पक्षाचा मंत्र असला पाहिजे.
. “आम्हाला लोकांना पुन्हा भेटावे लागेल आणि त्यांचा विश्वास परत मिळवावा लागेल. तळागाळातून पक्षाची बांधणी करूया. ” असे पाटकर म्हणाले.
पी. चिदंबरम यांनी खंत व्यक्त केली की गोव्यातील 67 टक्के लोकांनी भाजपच्या विरोधात मतदान केले असले तरी, मते वेगवेगळ्या दिशेने गेल्याने भाजप सत्ता मिळवू शकला.
“भाजप नवीन काही देणार नाही, पण गेल्या दहा वर्षांची पुनरावृत्ती करेल.” असे चिदंबरम म्हणाले.
पी चिदंबरम म्हणाले की, काँग्रेस युवा पिढीवर जबाबदारी सोपवत आहे. “भारतातील ६० टक्के लोकसंख्या ४० वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. आगामी दशकभर भारत हा तरुण देश राहील. आपण तरुण पिढीवर जबाबदारी सोपवली पाहिजे.” असे ते म्हणाले.
ते म्हणाले की, जगभरातून नेतृत्वासाठी तरुण वर्ग पुढे येत आहेत.
“आपल्याला खंबीर राहण्याची गरज आहे आणि आता तरुण पिढीने जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि त्यांचे ध्येय साध्य होईपर्यंत संघर्ष केला पाहिजे. ” असे ते म्हणाले.
गिरीश चोडणकर म्हणाले की, लोकांचा काँग्रेसवर विश्वास असल्याने कोणीही खचू नये. “आम्ही लोकांचे प्रश्न मांडू आणि चांगल्या कारणासाठी लढू.” असे चोडणकर म्हणाले.
त्यांनी अमित पाटकर यांचे अभिनंदन करून काँग्रेसला पुढे नेण्यासाठी एकत्रित येवून लढण्याची ग्वाही दिली.
नेक्स्ट जनरेशन हे काँग्रेसचे भविष्य असल्याचे कामत म्हणाले. “कार्यकर्ते हा काँग्रेसचा कणा आहे. गेली दहा वर्षे आम्ही सत्तेत नसलो तरी आमचे कार्यकर्ते खंबीर राहिले आणि एकजुटीने काम केले.” असे ते म्हणाले.
सध्या कॉंग्रेस मध्ये नवी सुरुवात होत असल्याचे राव म्हणाले.
“आम्ही कठीण काळातून गेलो आहोत. आज आपण पूर्वीपेक्षा अधिक बलवान आहोत.” असे ते म्हणाले.
“आता लोकांना समजू लागले आहे की केवळ काँग्रेस पक्षच भाजपला पराभूत करू शकतो.” असे ते म्हणाले.
वरिष्ठ उपाध्यक्ष एम के शेख यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष डॉ प्रमोद साळगावकर यांनी स्वागत केले आणि युरी आलेमाव यांनी आभार प्रकट केले.