Connect with us

गोवा खबर

मुख्यमंत्री सावंतांच्या हाताखाली ढवळीकर करणार काम

Published

on

Spread the love
भाजपातर्फे फळदेसाई आणि हळर्णकर तर मगो तर्फे ढवळीकर मंत्रीमंडळात
 गोवा खबर:विधानसभा निवडणुकीवेळी तृणमूल काँग्रेस सोबत युती करून भाजपा विरोधात निवडणूक लढवताना काही झाल तरी डॉ. प्रमोद सावंत यांच्या हाताखाली काम करणार नाही,अशी भीष्म प्रतिज्ञा केलेल्या मगोच्या सुदिन ढवळीकर यांनी आज मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हाता खालील मंत्रीमंडळात मंत्री म्हणून  शपथ घेतली.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज मंत्रिमंडळाचा विस्तार आज केला.मगोपच्या सुदिन ढवळीकर यांच्यासह थिवीचे भाजप आमदार नीळकंठ हळर्णकर आणि सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई यांनी राज्यपालांकडून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे.राजभवनच्या नव्या दरबार हॉलमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर लगेच खातेवाटप करण्याची शक्यता मुख्यमंत्री प्रमोद सावंत  यांनी व्यक्त केली आहे. त्याप्रमाणे उद्या  खातेवाटप केलं जाईल. रोहन खंवटे यांना मंत्रिमंडळात घेतल्याने हळर्णकर हे बार्देशचे दुसरे भाजप मंत्री ठरले आहेत. सुदिन ढवळीकर  यांना मंत्रिमंडळात घेतल्याने फोंडा तालुक्यात चार मंत्री होणार आहेत. आगामी पंचायत आणि लोकसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून ढवळीकरांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.ढवळीकर यांच्या मगो पक्षाने भाजपाला विनाअट पाठिंबा दिला आहे.ढवळीकर यांची आवडती असलेली बांधकाम आणि वाहतूक ही खाती यापूर्वीच नीलेश काब्राल आणि माविन गुदीन्हों यांना देण्यात आली आहेत.ढवळीकर यांनी काँग्रेस असो किंवा भाजपा प्रत्येक वेळी बांधकाम आणि वाहतूक ही अर्थपूर्ण खाती कायम आपल्याकडे राखलेली होती.यावेळी त्यांना कोणते खाते मिळते याकडे आता सगळ्याचे लक्ष लागून राहिले आहे.
मंत्रिमंडळ विस्तारामध्ये सरकारला पाठिंबा दिलेल्या 3 पैकी एकाही आमदाराला स्थान देण्यात आलेले नाही.कुडतरीचे अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड  यांचे नाव सुरुवातीपासूनच मंत्रीपदासाठी चर्चेत होते. मात्र, स्थानिक आणि केंद्रीय भाजप नेत्यांच्या सूचनेनुसार त्यांना मंत्रिपदाऐवजी महामंडळ देण्याचे ठरल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्याऐवजी सुभाष फळदेसाई यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे.
सुभाष फळदेसाई हे विधानसभेचे उपसभापती होते.त्यांनी मंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी उपसभापती पदाचा राजीनामा दिला आहे.त्यामुळे आता उपसभापती पदी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा देखील रंगणार आहे.