Connect with us

देश खबर

नौवहन महासंचालनालयाने 59 वा राष्ट्रीय सागरी दिन केला साजरा

Published

on

Spread the love

मर्चंट नेव्ही सप्ताह सोहळ्याची सांगता; ‘भारतीय सागरी उद्योगाला, निव्वळ शून्य उत्सर्जनाच्या उद्दिष्टासाठी चालना देणे’ ही या वर्षीची संकल्पना

केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन

 

 

 गोवा खबर:देशभर आज राष्ट्रीय सागरी दिन साजरा केला जात असताना, मुंबई पोर्ट ट्रस्टच्या डोमेस्टिक क्रूझ टर्मिनस येथे नौवहन महासंचालनालय, मुंबई तर्फे ‘मर्चंट नेव्ही वीक’ सप्ताह सोहळ्याची सांगता भव्य समारंभाने झाली. बंदरे, नौवहन आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती.

राष्ट्रीय सागरी दिन हा भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासात सागरी व्यापाराची भूमिका, जागतिक व्यापारातील भारताची भूमिका आणि त्याचे धोरणात्मक स्थान यांचे स्मरण ठेवण्यासाठी समर्पित आहे.  “भारतीय सागरी उद्योगाला, निव्वळ शून्याकडे चालना ही – या वर्षीची संकल्पना उत्सवासाठी स्वीकारण्यात आली होती.

5 एप्रिल 1919 रोजी एसएस लॉयल्टी, हे भारतीय ध्वजाखालील पहिले व्यावसायिक जहाज मुंबई ते लंडनला निघाले. त्या प्रवासाच्या स्मरणार्थ 05 एप्रिल रोजी राष्ट्रीय सागरी दिन साजरा केला जातो. जहाजाची मालकी सिंधिया स्टीम नेव्हिगेशन कंपनी लिमिटेडकडे होती, त्या काळातील ती  सर्वात मोठी स्वदेशी नौवहन कंपनी होती.

समारंभाचे प्रमुख पाहुणे केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद वाय नाईक यांनी याप्रसंगी सागरी क्षेत्रातल्या सर्व भागधारकांचे अभिनंदन केले. भारतीय सागरी क्षेत्रात लैंगिक समानता हे आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले. सागरी क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी उचललेल्या पावलांची सविस्तर माहितीही त्यांनी दिली. सध्या देशात 3000 महिला या क्षेत्रात कार्यरत  असल्याचे ते म्हणाले.

मेरिटाइम व्हिजन 2030 ची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आघाडीच्या जागतिक सागरी विद्यापीठांसोबत शैक्षणिक भागीदारी वाढवणे आणि भारतीय सागरी संस्थांचे प्रशिक्षण आणि कौशल्य वृद्धींगत करत जागतिक मानकांवर नेण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. त्यांनी सागरी समुदायाने भारतीय ध्वजाखाली मालवाहतुकीची क्षमता वाढवण्यासाठी उचललेल्या विविध पावलांचेही कौतुक केले.

श्रीपाद नाईक पुढे म्हणाले की, सध्या देशात 156 सागरी प्रशिक्षण संस्था आहेत. कोविड-19 महामारीच्या संकटकाळात भारतीय सागर क्षेत्राने दिलेला प्रतिसाद अतिशय उल्लेखनीय होता, असे ते म्हणाले. सागरी कौशल्य विकसित करण्याबाबत मंत्री म्हणाले की, सागरी क्षेत्रात आयआयटी आणि आघाडीच्या शिक्षण संस्थांसोबत सहकार्य करुन कुशल सागरी मानव संसाधने आणण्यात येत आहे. आत्मनिर्भर भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी सागरी क्षेत्र हे अतिशय महत्त्वाचे क्षेत्र असल्याचे नाईक म्हणाले.

याप्रसंगी ‘डफरीन, राजेंद्र, चाणक्य’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले.  टीएस डफरिन (1927-72), टीएस राजेंद्र (1972-93) आणि  टीएस चाणक्य (1993 – आजपर्यंत)  हे भारतीय सागरी विद्यापीठ, मुंबईचे प्रशिक्षण जहाज आहेत.  डफरिन आणि राजेंद्र हे खरे समुद्रभ्रमण करणारी जहाज होती, तर टीएस चाणक्य हे नवी मुंबईतील किनाऱ्यावरील प्रशिक्षण अकादमी आहे. ते बीएससी (नॉटिकल सायन्सेस) पदवीसह विविध प्रशिक्षण कार्यक्रम देते.

नौवहन विभागाचे महासंचालक अमिताभ कुमार यांनी आपल्या मुख्य भाषणात नमूद केले की, सामान्यतः सागरी क्षेत्रातील निव्वळ-शून्य उत्सर्जन उद्दिष्टाच्या  दिशेने जाण्यासाठी बंदरे, भविष्यातील पर्यायी इंधन, जहाजांमधील तांत्रिक बदल, सुधारित लॉजिस्टिक आवश्यकता तसेच  विशेषतः नाविकांचे  आणि संपूर्ण सागरी क्षेत्राचे योग्य संवेदीकरण यांसह एकूण परिचालन पुरवठा साखळीवर विचार करणे आवश्यक आहे. सागरी क्षेत्रामध्ये समन्वित आणि सहयोगी संशोधन सुरु ठेवण्यासाठी  नाविकांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र परीक्षा आणि सागरी ज्ञान क्लस्टरची स्थापना करण्याची  संचालनालयाची  प्रक्रिया सुरु आहे, याचा उल्लेख त्यांनी केला.

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते खालील सागर सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आले:

 अ.क्र एनएमडीसी  पुरस्कारांचे  नाव पुरस्कार विजेते
1
सागर सन्मान वरुण पुरस्कार:

 

दिवंगत कॅप्टन हॅरी सुब्रमण्यम

(मरणोत्तर).

2 सागर सन्मान शौर्य  पुरस्कार : कॅप्टन सुशील कुमार सिंह आणि ‘’ग्रेटशिप अहल्या’जहाजाचे  चालक दल
3 सागर सन्मान  सर्वोत्कृष्ट सागरी प्रशिक्षण संस्था पुरस्कार: द ग्रेट ईस्टर्न इन्स्टिट्यूट ऑफ मेरीटाइम स्टडीज, लोणावळा, पुणे
4 सागर सन्मान सर्वोत्कृष्ट भारतीय जहाज  कंपनी   पुरस्कार: भारतीय नौवहन महामंडळ (एससीआय)
5 सागर सन्मान सर्वोत्कृष्ट भारतीय नाविक नियोक्ता   पुरस्कार: भारतीय नौवहन महामंडळ (एससीआय)
6 सागर सन्मान   सर्वोत्कृष्ट भारतीय नाविक परदेशी नियोक्ता पुरस्कार एमएससी क्रूविंग सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड

दरम्यान सकाळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ट्विटच्या मालिकेत राष्ट्रीय सागरी दिनानिमित्त भारताच्या गौरवशाली सागरी इतिहासाचे स्मरण केले. भारताच्या आर्थिक विकासासाठी  सागरी क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित करत ते म्हणाले की, गेल्या आठ वर्षांत भारत सरकारने बंदरांवर आधारित  विकासावर लक्ष केंद्रित केले असून यात  बंदर क्षमता वाढवणे आणि विद्यमान प्रणाली अधिक कार्यक्षम बनवणे या गोष्टींचा समावेश आहे भारतीय उत्पादनांना नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळणे सुनिश्चित करण्यासाठी जलमार्गांचा वापर केला जात आहे. सागरी परिसंस्था आणि विविधता सुनिश्चित करण्यासाठी. भारत सरकार पुरेशी काळजी घेत आहे, यावर त्यांनी भर दिला.

 

कोविडच्या कठीण काळात देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी  आणि जागतिक पुरवठा साखळी कार्यान्वित ठेवण्यासाठी  नाविकांनी दिलेले  महत्त्वाचे योगदान, केंद्रीय बंदरे, नौवहन  आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आपल्या संदेशात अधोरेखित केले. कोविड महामारीच्या काळात 2.10 लाखांहून अधिक भारतीय नाविकांनी भारतीय आणि परदेशी जहाजांवर सेवा दिली, अशी माहिती मंत्र्यांनी दिली. 2016 ते 2019 दरम्यान जागतिक नौवहनामध्ये भारतीय नाविकांचा वाटा 25% वाढला आहे. लॉजिस्टिक खर्च कमी करण्यासाठी आणि भारताला सागरी क्षेत्रातील आघाडीचा देश  बनवण्यासाठी ‘व्यवसाय सुलभतेला सरकार प्रोत्साहन देत आहे, असे त्यांनी सांगितलॆ.

सागरी क्षेत्राशी संबंधित मान्यवर व्यक्ती, नाविक आणि त्यांचे कुटुंबीय, नवी दिल्लीतील बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालय, मुंबईतील  नौवहन विभागाचे महासंचालक, भारतीय नौवहन महामंडळ (एससीआय), आयआरएस, नौवहन  कंपन्या, सागरी प्रशिक्षण संस्था, भारत आणि परदेशातील सागरी क्षेत्रातील प्रतिनिधी  आणि सागर सन्मान पुरस्कार विजेते आणि त्यांचे कुटुंबीय, भारत सरकारचे इतर विभाग आणि राज्य सरकारचे अधिकारी आणि कर्मचारी, या कार्यक्रमात सहभागी झाले होते.