Connect with us

गोवा खबर

अमित शहांचा कल्पनेपलीकडच्या कायापालटाने गोवा कोळसा, गुन्हेगार, ड्रग्समाफिया केंद्र बनणार व गोव्याची अस्मिता नष्ट होणार : गिरीश चोडणकर

Published

on

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

गोवा खबर : गोव्याचा कल्पनेपलीकडचा कायापालट करू, अशी केंद्रीय गृह मंत्र्यांनी केलेली घोषणा म्हणजे गोव्याचे कोळसा हब, ड्रग्स माफिया केंद्र तसेच गुन्हेगारांचे आश्रयस्थान करण्याची नांदी असून, गोव्याची अस्मिता नष्ट करण्याचा हा गुन्हेगारी पार्श्वभूमी लाभलेल्या तसेच तडीपार झालेल्या अमित शहांचा एक प्रकारे गोमंतकीयांना इशाराच आहे अशी बोचरी टीका काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली.

आज काँग्रेस भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत गिरीश चोडणकर यांनी गृहमंत्री अमित शहा यांनी काल केलेल्या पूर्ण बहुमताने सत्तेत आल्यास गोव्याचा कायापालट करण्याच्या केलेल्या घोषणेचा समाचार घेत भाजपवर जोरदार पलटवार केला. पत्रकार परिषदेला कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, माध्यम विभाग प्रमुख अमरनाथ पणजीकर व माजी आमदार आग्नेल फर्नांडिस हजर होते.

गोव्याचे कोळसा हब, गुन्हेगारांचे आश्रय स्थान तसेच ड्रग्स माफिया केंद्र करण्याचा भाजपचा डाव असून, राज्याचे पर्यावरण नष्ट करून गोव्याची अस्मिता संपवण्याचा भाजपचा कुटील डाव आहे. मोदींच्या क्रोनी क्लबला गोवा दान देण्याचा डाव भाजप खेळत आहे असा दावा गिरीश चोडणकर यांनी केला.

आज देशात इंधनाचे वाढणारे दर तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाढणारे भाव यासाठी केवळ भाजप सरकार जबाबदार आहे. आता फेक माहितीवर लोकांना फसविणे भाजपला शक्य होणार नाही. अमित शहांना गोव्याच्या समस्यांवर बोलण्यापेक्षा निवडणुकांवर बोलणे महत्त्वाचे वाटले. भाजपने विकास केला असता तर अमित शहांना मतांची भीक मागण्यासाठी गोव्यात यावे लागले नसते असा टोला आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी यावेळी हाणला.

गोव्याची जीवनदायिनी आई म्हादईचा राजकीय स्वार्थासाठी कर्नाटकशी सौदा केल्यानंतर आता गोव्यातील नद्यांचे मोदींचे उद्योजक मित्र अदानी-अंबानींकडे सर्व नद्या देण्याचा बेत भाजपने आखला आहे. लोक भावनांचा आदर न करता भाजप नावशी येथे मरिना प्रकल्प सुरू करणार आहे. आमच्या खारवी बांधवांच्या घरावर संकट आणून पोर्ट लिमीट वाढवून मच्छीमारांना भाजप सरकार रस्त्यावर आणणार आहे. किनारी व्यवस्थापन आराखड्यात भानगडी करून गोव्याची किनारपट्टी भाजप आपल्या उद्योजक मित्रांना देणार आहे.

गृहमंत्री अमित शहा यांनी खाण व्यवसाय, ऑक्सिजनच्या कमतरतेने झालेले कोविड मृत्यू, कोलमडलेली इंटरनेट व्यवस्था, दिवाळखोरी व बेरोजगारी यावर भाष्य करण्याचे का टाळले हे भाजपने लोकांना स्पष्ट करावे अशी मागणी गिरीश चोडणकर यांनी केली.

गोव्यात वाढती बेरोजगारी थांबविण्यास भाजप सरकारला आलेले अपयश, तसेच प्रशासनात बोकाळलेला भ्रष्टाचार यावर अमित शहा गप्प राहिले. गोवा लोकायुक्तांनी चौकशीचे आदेश दिलेला 21 भ्रष्टाचार प्रकरणाचे काय झाले हे अमित शहांनी लोकांना सांगावे. भाजप पदाधिकार्‍यांच्या कारखान्यात सापडलेले कॅटामायन ड्रग्सची चौकशी कुठवर आली हे भाजपने सांगणे गरजेचे आहे.

गोव्याला आदर्श राज्य करण्याचे अमित शहा यांचे आश्वासन म्हणजे एक जुमला आहे. मागील दहा वर्षात गोव्याचा विकास करण्यास सरकार का अपयशी ठरले? भाजपचे मुख्यमंत्री, मंत्री आमदार स्वत:ची पोळी भाजून घेण्यात व्यस्त राहिले व त्यामुळेच गोवा आज दिवाळखोर झाला व गोमंतकीय प्रचंड दबावाखाली असल्याचे गिरीश चोडणकर म्हणाले.

Continue Reading