Connect with us

गोवा खबर

ड्रग माफियांना एनसीबी पाठीशी का घालते आहे ? :डॉ. शमा मोहम्मद

Published

on

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

 

गोवा खबर:जो उत्साह अमली पदार्थ नियंत्रण पथक (एनसीबी) ड्रग व्यवसायात गुंतलेल्या ‘छोट्या माशां’ना पकडण्यात दाखवते आहे तितकाच उत्साह ते या व्यवसायातील ‘मोठ्या माशां’बद्दल का दाखवत नाहीत? अदाणींच्या मुंद्रा बंदरात पकडण्यात आलेल्या सुमारे तीन हजार किलो हेरॉईनसंधर्भात एनसीबीने अद्याप चकार शब्द काढलेला नाही. एनसीबी का व कोणाच्या सांगण्यावरून अशा प्रकारे ड्रग माफियांना पाठीशी घालत आहे? असा थेट सवाल अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रवक्त्या डॉ. शमा मोहम्मद यांनी विचारला.

पणजी येथील काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, कार्याध्यक्ष आलेक्स सिक्वेरा, माध्यम विभाग प्रमुख अमरनाथ पणजीकर यांची यावेळी उपस्थिती होती. यावेळी डॉ. शमा मोहम्मद यांनी ड्रग माफियांना खुले माळरान देणाऱ्या भाजप सरकारवर घणाघाती टीका केली.
५ सप्टेंबर २०२१ रोजी  गुजरात येथील मुंद्रा बंदरातून महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय )’सेमिकट टाल्कम पावडर’ अशा दिशाभूल करणाऱ्या नावाने पॅकिंग केलेले  सुमारे तीन हजार किलो इतके हेरॉईन हस्तगत केले. डीआरआयने आजवर केलेली हि सगळ्यात मोठी कारवाई आहे. त्यांनी जप्त केलेल्या अमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत एकूण किंमत सुमारे २१ हजार कोटी इतकी आहे. अफगाणिस्तानातून इराणमार्गे गुजरात मध्ये आलेल्या जहाजातून दोन मोठ्या कंटेनर मध्ये हेरॉईन सापडले आहे.. आणि हे ‘टाल्कम पावडर’ अफगाणिस्तानातील मेसर्स हसन हुसेन लिमिटेड या नावाने निघाले असून भारतात विजयवाडा, आंध्र प्रदेश येथील आशी ट्रेडिंग कंपनीच्या पत्त्यावर ते आले होते.
अशा प्रकारे मुंद्रा बंदरामध्ये पकडण्यात आलेले हे काही पहिलेच अमली  पदार्थाचे कंटेनर नाहीत. यापूर्वी अफगाणिस्तानमधूनच जून २०२१ मध्ये एक लाख सत्तर हजार कोटी रुपयांचे सुमारे २५ हजार किलो हेरॉईन जप्त करण्यात आले असल्याचे डॉ. शमा मोहम्मद यांनी यावेळी नमूद केले.
या जीवघेण्या ड्रग्जचा प्रसार आता आपल्या देशात झाला आहेत. सरकारने यावर कोणतेच बंधन ठेवलेले नसून, देशाच्या इतिहासात अशाप्रकारे खुलेआम अमली पदार्थाची तस्करी प्रथमच होत आहे.
कोणत्याही राजकीय ‘आशिर्वादा’शिवाय अशा प्रकारे एवढ्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाची तस्करी सहजशक्य नाही. अशापद्धतीने मुंद्रा बंदरामध्ये तस्करी होत असताना एनसीबी , आय बी, सीबीआय आणि सीमाशुल्क विभाग डोळ्यावर पट्टी बांधून बसले आहेत का? असा रोकडा सवाल यावेळी डॉ. शमा मोहम्मद यांनी केला.
 मुद्रा बंदराचे मालक अदानी आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील सख्यत्वामुळेच, तस्करीच्या वारंवार घटना घडल्यानंतर, मुंद्रा बंदराची चौकशी केली गेली नाही का? असा प्रश्न यावेळी त्यांनी विचारला.
एनसीबीला देशातील औषध कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी देण्यात आली आहे. भारतात ड्रगच्या हालचालींवर लक्ष ठेवणे, तपास करणे आणि प्रतिबंध करणे ही एनसीबीची प्राथमिक जबाबदारी आहे. ही तीच संस्था आहे जी सुशांत सिंग मृत्यू प्रकरणात 59 ग्रॅमपेक्षा जास्त गांजा सापडल्याने अतिसक्रिय झाली होती पण आता हजारो किलो अमली पदार्थाची देशात तस्करी होत असताना ती कारवाई करताना कुठेच दिसत नाही.
गेल्या १८ महिन्यापासून एनसीबीला पूर्णवेळ अध्यक्ष नाही. अत्यंत जोखमीची जबाबदारी असलेल्या संस्थेला इतका प्रदीर्घ काळ पूर्णवेळ अध्यक्ष नसणे हि खूपच गंभीर बाब आहे. त्यामुळेच डीआरआय सारखी संस्था जिचे मुख्य काम अमली पदार्थाशी निगडित नाही, पण तरीही या संस्थेने अशाप्रकारची कामगिरी केली असल्याचे डॉ. शमा मोहम्मद यांनी सांगितले.
या सगळ्या प्रकारात गंभीर मुद्दा हा आहे की हे ड्रग अफगाणिस्तानातून आणली गेले आहेत. त्यामुळे या विक्रीतून मिळणारा पैसा तालिबानसारख्या आतंकवादी संघटनेला मिळतो. आणि त्यांच्या माध्यमातून देशातील फुटीरतावादी आणि दहशतवादी कारवायांना हाच पैसे पुरवून आपल्याच देशाला अस्थिर करण्यात येऊ शकते.
ड्रग्स तरुणांसाठी सर्वार्थाने जीवघेणे आहे. ड्रग्ज केवळ तरुणांनाच नाही तर व्यसनाच्या दुष्टचक्राने त्यांचे संपूर्ण कुटुंब नष्ट करतात. ड्रगमुळे  गुन्हेगारी कारवायांमध्ये वाढ होते. हे मादक विष आपल्या देशात पसरण्यापासून आपणच रोखले पाहिजे.
गेल्या काही वर्षात गुजरात हे ड्रग व्यवहारासाठी सुपीक आणि सुरक्षित ठिकाण बनले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नाकाखालून या ड्रग माफियांनी प्रचंड भरभराट केली आहे. अशा प्रकारे अवैध तस्करी राजकीय आश्रय असल्याशिवाय होणे शक्य नाही. छोटया तस्करीमध्ये यशस्वी झाल्याशिवाय ड्रग माफिया अशा प्रकारचा हजारो किलो ड्रग्जची तस्करी करण्याचा प्रयत्न करणार नाहीत; या सगळयाला सरकार पायबंद घालणार आहे कि नाही?
अमली पदार्थाच्या अशा तस्करीविरोधात देशभरात धडक कारवाई करण्याची नितांत गरज असताना सरकार मूग गिळून गप्प बसले आहे. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित  शाह हे या सगळ्या विषयावर अद्याप काहीच का बोलत नाहीत?
अदानीच्या मुंद्रा बंदरातून सुरू असलेल्या ड्रग तस्करीची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या दोन विद्यमान न्यायाधीशांचा समावेश असलेल्या आयोगामार्फत करण्यात यावी, अशी काँग्रेस पक्षाची मागणी आहे. जोपर्यंत ड्रग माफिया तुरुंगात जात नाहीत तोपर्यंत देशातील तरुणांना आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका कायम राहील.