Connect with us

गोवा खबर

गोव्यातील कॅसिनो सोमवार पासून सुरु

Published

on

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
 गोवा खबर : कोविडची दूसरी लाट सुरु झाल्या नंतर लागू केलेल्या राज्यव्यापी कर्फ्यूमुळे गेले 5 महीने बंद असलेले कॅसिनो, स्पा, मसाज पार्लर, रिव्हर क्रूज सोमवारपासून ५० टक्के क्षमतेने सुरू होणार आहेत.या ठिकाणी जाणाऱ्यांना कोविड लसीचे दोन्ही डोस पूर्ण किंवा आरटीपीसीआर चाचणीचे निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल, असे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले आहे.
 त्यासंदर्भातील नियमावली लवकरच जारी करण्यात येईल. ईडीएम पार्ट्या, नाईट क्लबना तूर्त परवानगी दिलेली नाही. शाळा सुरू करण्यासंदर्भातील निर्णय कृतिदलाच्या पुढील बैठकीनंतर घेतला जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले आहे.
 राज्यातील कोविडचा प्रसार नियंत्रणात आला आहे. त्यामुळेच सरकारने कृतिदलाच्या शिफारशीनुसार पर्यटनाशी संबंधित उद्योग, व्यवसाय नियमावली जारी करून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसारच सोमवारपासून कॅसिनो, स्पा, मसाज पार्लर, रिव्हर क्रूज ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यात येतील.
ऑक्टोबरपासून इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यात यावेत, अशी सूचना कृतिदलाने केली आहे. पण, कृतिदलाच्या पुढील बैठकीत आढावा घेऊन यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.
दरम्यान,  आठवी ते बारावीपर्यंतचे प्रत्यक्ष वर्ग ४ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात यावे. प्राथमिक शाळांच्या प्रत्यक्ष वर्गांबाबत दिवाळीनंतर कोविड परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात यावा. कॅसिनोंसह पर्यटन उद्योगाशी संबंधित सर्वच उपक्रम ५० टक्के क्षमतेने येत्या सोमवारपासून सुरू करावेत, असा प्रस्ताव कोविड संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या कृतिदलाने सरकारला सादर केला असल्याची माहिती कृतिदलाचे सदस्य डॉ. शेखर साळकर यांनी दिली.
कृतिदलाची २४ किंवा २५ सप्टेंबरला पुन्हा बैठक होणार आहे. या बैठकीत राज्यातील कोविड परिस्थितीचा पुन्हा एकदा आढावा घेण्यात येईल. त्यानुसार सरकारला शाळा सुरू करण्याबाबत पुढील सूचना सादर केल्या जातील, असे साळकर म्हणाले.
रशियातून येणाऱ्या पर्यटकांच्या चार्टर विमानांना गोव्यात उतरण्यास परवानगी देण्यात यावी, असे पत्र आपण पंतप्रधान कार्यालयास (पीएमओ) पाठवणार असल्याची माहिती मंत्री मायकल लोबो यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. कोविडमुळे कोलमडलेली राज्याची आर्थिक स्थिती लवकरात लवकर रुळावर येण्यासाठी राज्यातील पर्यटन व्यवसाय, उद्योग सुरू होण्याची आवश्यकता आहे. विदेशी पर्यटक गोव्यात आल्याशिवाय पर्यटनास चालना मिळणार नाही,असे लोबो म्हणाले.
कॅसिनो आणि पर्यटन उद्योग सुरु झाल्यास कोविड पुन्हा वाढू नये यासाठी मार्गदर्शक तत्वे पाळून आवश्यक ती खबरदारी सरकार आणि पर्यटन व्यावसायिकांना घ्यावी लागणार आहे.

Continue Reading