Connect with us

गोवा खबर

लसीकरणात गोव्याची ऐतिहासिक कामगिरी पंतप्रधान मोदी : आरोग्य कर्मचारी आणि कोरोना योध्या सोबत साधला संवाद

Published

on

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
 गोवा खबर:कोरोना काळात केंद्र व राज्य सरकारला गोमंतकीयांनी चांगली साथ दिली यामुळेच 100 टक्के पात्र लोकांना लस देण्यात गोव्याने अव्वलस्थान प्राप्त केले. माझे मित्र तथा आधुनिक गोव्याचे शिल्पकार स्व. मनोहर पर्रीकर आज असते तर त्यांची छाती अभिमानाने भरून आली असती, असे उद्गार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काढले. 
सकाळी साडेदहा वाजता आयोजित आभासी कार्यक्रमात आरोग्य कर्मचारी, कोविद योद्धे आणि गोमंतकीयांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक, उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर, बाबू कवळेकर, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, मंत्री जेनिफर मोन्सेरात, मुख्य सचिव परिमल राय आणि आरोग्य खात्याचे अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.
पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, वादळी पाऊस, पूरस्थिती आदी अस्मानी संकट येऊनही गोमंतकीयांनी लसीकरणासाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद होता. राज्य सरकार, आरोग्य खात्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अथक प्रयत्न यामुळे 100 टक्के पात्र लोकांना लस देण्यात अव्वल ठरला. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत स्वतः डॉक्टर असल्याने कोरोना महामारीवर नियंत्रण आणण्यात गोव्याला यश मिळाले. मंत्री, आमदार, खासदार, संबंधित खात्याचे अधिकारी आणि कर्मचारी या सर्वांच्या मेहनतीमुळे हे सर्व शक्य झाल्याचे पंतप्रधान म्हणाले.
गोवा राज्य खऱ्या अर्थाने विविधतेने नटलेले राज्य आहे. पश्चिम आणि पूर्व देशांचा संगम येथे पाहायला मिळतो. येथे दसरा, दिवाळी आणि गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहात साजरी केली जातेच. तसेच नाताळ ही धुमधडाक्यात साजरा केला जातो. सर्व धर्मीय या सण आणि उत्सवात सहभागी होतात. यामुळे गोव्याचे वेगळेपण अधोरेखित होते, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. कोरोना काळात चाचणी, उपचार आणि लसीकरण या सर्व गोष्टी सुरळीत पार पाडणे इतके सोपे नव्हते. पण सरकार आणि गोमंतकीय लोकांनी हातात हात घालून काम केल्याने सर्व शक्य झाले. लसीकरण विषयी लोकांमध्ये असलेला भ्रम दूर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कोविढ योद्धे यांनी केलेले काम उल्लेखनीय असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
केवळ लसीकरण नव्हे तर लस वाया जाऊ न देता गोवाने केलेले कार्य देशात आदर्श ठरले आहे. काल शुक्रवारी देशात विक्रमी म्हणजेच तब्बल अडीच कोटी लोकांचे लसीकरण झाले. विरोधक आता यावरही राजकारण करतील पण आपण त्याकडे लक्ष न देता आपले लक्ष्य साध्य करूया, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केले. गोवा सरकारने आता दुसऱ्या डोस साठी राज्यात टीका उत्सवास प्रारंभ केला आहे. दुसरा डोस घेणे बाकी असलेल्या गोमंतकीय नागरिकांनी या अभियानास प्रतिसाद देऊन संपूर्ण लसीकरण पूर्ण करणाऱ्या राज्यात प्रथम स्थान प्राप्त करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
गोवा राज्य जागतिक पर्यटन स्थळ आहे. पर्यटन क्षेत्रात गोव्याचे नाव अग्रस्थानी आहे. कोरोना नियंत्रणात असला तरी अजून संपलेला नाही. तरीही देशांतर्गत पर्यटन सुरू व्हावे यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. म्हणूनच पर्यटनावर अवलंबून असलेल्या राज्यातील लसीकरण वेगाने पूर्ण व्हावे यासाठी केंद्र सरकार पावले टाकत आहे. गोव्यातील पर्यटन हंगाम आता सुरू होईल. या पार्श्वभूमीवर राज्यात येणाऱ्या पर्यटकांनाही लस देण्यात येणार आहे. पण गोमंतकीय नागरिकांनी आणि येथे पर्यटनासाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाने कोरोनाचे भान ठेवणे आवश्यक आहे. कोरोना कमी होत आहे पण संपलेला नाही हे लक्षात ठेवा. आणि कोरोना नियमांचे काटेकोर पालन करा, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केले.
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत स्व. मनोहर पर्रीकर यांचा वारसा पुढे नेत आहेत. म्हणूनच महामारीच्या काळातही राज्यातील विकासकामे थांबली नाहीत. पायाभूत सुविधांसह सर्व सरकारी योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचवण्यात राज्य सरकार यशस्वी ठरले आहे. राज्यातील शेतकरी, कष्टकरी, मच्छीमार आणि पर्यटनाशी संबंधित सर्व उद्योग व्यवसायांना मदत करणे सुरू असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांनी यावेळी गोवा सरकारने वीज, पाणी, पायाभूत सुविधा, हर घर नल योजनेसह राज्याला हागणदारी मुक्त केले असल्याचा उल्लेख केला.
मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व मान्यवरांचे स्वागत केले. मुख्य सचिव परिमल राय यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
कोरोना योद्यांशी संवाद…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी राज्यातील आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांसह कोरोना योध्यांशी संवाद साधला. यांचे अनुभव ऐकून घेतले. तसेच त्यांना मार्गदर्शन करून त्यांचे अभिनंदन ही केले. या चर्चेत डॉ नितीन, नागरिक नजीर शेख, आरोग्य खात्याच्या कर्मचारी सीमा फर्नांडिस, मातृछाया संस्थेचे शशिकांत भगत, श्रुती मांद्रेकर – वेगुर्लेकर आणि दिव्यांग सुमेरा खान यांनी भाग घेतला.
सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास….
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सबका साथ, सबका विकास यासह सबका प्रयास अशी नवी घोषणा केली. लोकांच्या प्रयत्नामुळे गोव्याने लसीकरण करण्यात आघाडी घेतली. प्रत्येक क्षेत्रातील तज्ज्ञांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि जबाबदार नागरिकांनी पुढाकार घेतल्याने हे शक्य झाले असल्याचे पंतप्रधान म्हणाले. म्हणूनच आता सबका साथ, सबका विकास यासह सबका प्रयास हे उद्दिष्ट ठेऊया आणि देशाला कोरोनामुक्त करूया, असे आवाहन पंतप्रधानानी केले.