Connect with us

गोवा खबर

कोविड गैरव्यवस्थापन, वाढती गुन्हेगारी, रेल्वे दुपदरीकरणावर कॉंग्रेस विधीमंडळ बैठकीत सरकारच्या धोरणांवर आक्षेप

Published

on

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
गोवा खबर: गोव्यात भाजप सरकारच्या बेजबाबदारपणामुळे तसेच नाकर्तेपणाने आज सर्वत्र अनागोंदी कारभार चालला असुन, राज्यातील कायदा व सुव्यवस्था, कोविड व्यवस्थापन तसेच रेल्वे दुपदरीकरणाच्या बाबतीत सरकारच्या धोरणांवर आज झालेल्या कॉंग्रेस विधीमंडळ गटाच्या बैठकीत गंभिर आक्षेप घेण्यात आले. 
गोवा विधानसभा संकुलात विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पर्येचे आमदार प्रतापसिंग राणे, नावेलीचे आमदार लुईझीन फालेरो, कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेंसो हजर होते.
बैठकीच्या सुरूवातीला ज्येष्ठ कॉंग्रेस नेते  ऑस्कर फर्नांडिस यांच्या निधनावर त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ऑस्कर फर्नांडिस यांच्यामुळेच मडगावचे इएसआय इस्पितळ उभे झाले याची आठवण काढुन, सर्व सदस्यांनी दिवंगत नेत्यास आदरांजली वाहिली.
 कोविडचे संकट अजुनही कायम असल्याने लोकांनी काळजी घ्यावी व लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन कॉंग्रेसच्या आमदारानी केले आहे. सरकारने कोविड लसीकरणाच्या बाबतीत लोकांच्या मनात असलेले संशय दूर करावेत तसेच टीका उत्सवांचे राजकीयीकरण करू नये असे मत सर्व आमदारांनी व्यक्त केले.
कोविड संसर्गाने मृत्यु आलेल्या ६८ जणांची नोंदणी दोन दिवसांपुर्वीच करण्याच्या सरकारच्या कृतीची गंभीर दखल घेत, कॉंग्रेस विधीमंडळ गटाने भाजप सरकारला जबाबदारीने वागण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी सदर मृत्युंची उशीरा नोंदणी का झाली याचे सविस्तर स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे अशी मागणी कॉंग्रेस आमदारांनी केली.
राज्यातील ढासळलेल्या कायदा व सुव्यवस्थेवर आजच्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. एनसीआरबी तर्फे जारी करण्यात आलेल्या अहवालात २०२० मध्ये गोव्यात ७३ टक्के गुन्हे वाढल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सदर अहवालात गोव्यातील बलात्कारांची सरासरी ७.८ टक्के असल्याचे नमुद करण्यात आले असुन, देशातील बलात्कार प्रकरणांची  सरासरी ४.३ टक्के असल्याचे स्पष्ट करण्यात आल्याने गोव्यात महिलांवरील अत्याचारात वाढ झाल्याचे उघड आहे व त्यास भाजप सरकार जबाबदार असल्याचा आरोप कॉंग्रेस विधीमंडळ गटाने केला.
कळंगुट येथे किनाऱ्यावर सापडलेल्या   सिध्दी नाईक हिच्या मृत्युचे गुढ अजुनही उकलले नसुन, सरकार सदर मृत्युची चौकशी करण्यास अपयशी ठरल्याचा ठपका यावेळी सर्व कॉंग्रेस आमदारांनी भाजप सरकारवर ठेवला. गोव्यात आता अर्भकांना व खास करुन मुलींना बेवारसपणे सोडुन देण्याचे प्रकार वाढत असल्याने बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली.
सरकारने रेल्वे दुपदरीकरणासाठी जमिन संपादन करण्यास दिलेल्या परवानगीवर आजच्या बैठकीत चर्चा झाली व लोकभावनेचा आदर न करता सरकार गोव्याच्या पर्यावरणास बाधा आणणारे प्रकल्प लोकांवर लादण्याचा प्रयत्न करीत आहे असे मत सर्व आमदारांनी व्यक्त केले. कॉंग्रेसचे सर्व आमदार गोवेकरांचा आवाज बनुन काम करणे चालुच ठेवणार असुन, गोमंतकीयांचे प्रश्न घेवून अधिक आक्रमकपणे पुढे येण्याचे आजच्या बैठकीत ठरविण्यात आले.
गोव्यातील पावाच्या दरात वाढ करण्याची घोषणा बेकर्स संघटनेने केल्याने लोकांवर आर्थिक बोजा अधिक पडणार असल्याने चिंता व्यक्त करण्यात आली. सरकारने त्वरित बेकर्सचे सर्व प्रश्न सोडवावेत व गोयंचे दायज योजना चालीस लावुन पारंपारीक पोदेर व्यावसायिकांना दिलासा द्यावा असे मत विधीमंडळ गट सदस्यांनी व्यक्त केले.
सरकारने धिसाडघाईने संमत केलेल्या भूमीपुत्र विधेयकावर कॉंग्रेस विधीमंडळ गटाने नापसंती व्यक्त केली व सरकारने यापुढे सर्व संबंधिताना विश्वासात घेवुन व योग्य अभ्यास करुनच अशी विधेयके विधानसभेत मांडावीत असे मत व्यक्त केले.
गोव्यात राष्ट्रीय कार्यकारीणी बैठकीसाठी आलेले राष्ट्रीय युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष बी श्रीनिवास तसेच गोवा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष वरद म्हार्दोळकर व इतर युवक कॉंग्रेस कार्यकर्त्यांवर ‘ वाढती बेरोजगारी व महागाई” च्या विरोधात आझाद मैदानावर केलेल्या आंदोलनावेळी झालेला लाठीमार व अटकेचा आजच्या बैठकीत निषेध करण्यात आला.

Continue Reading