Connect with us

माझे मत (ब्लॉग)

भाजप सुस्साट… विरोधक थंडच…!

Published

on

Spread the love
विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोवा भाजपने प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. तर दुसऱ्या बाजूला विरोधक अजूनही चाचपडत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या चार – पाच महिन्यांपासून भाजप विविध उपक्रम आणि कार्यक्रम द्वारे लोकांपर्यंत जात आहे. मात्र राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसमधील नेतेपदाचा घोळ सुरू आहे. 2017 पासून पक्षात सुरू असलेली संदोपसंदी अजूनही शमलेली नाही. निवडणुका जवळ येत असताना पक्षातील गटबाजी उफाळून आली. याची दखल घेऊन पक्षाने ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नेमणूक केली. दरम्यानच्या काळात राज्यातील सर्व गट समित्या बरखास्त करण्यात आल्या. तर प्रदेशाध्यक्ष पदी गिरीश चोडणकर यांनाच कायम ठेवले. आणि पक्षाच्या राज्यस्तरीय विविध समित्यांची निवड केली. या समित्यांची जबाबदारी ज्येष्ठ नेत्यांकडे दिली.
पी चिदंबरम दोन दिवस गोव्यात होते. या काळात त्यांनी पक्षाचे आमदार, पदाधिकारी आणि नेत्यांशी संवाद साधला. वरकरणी सर्व गोष्टी सुरळीत होत असल्याचे दिसत असल्या तरी वस्तुस्थिती वेगळी आहे. प्रदेशाध्यक्ष पदी चोडणकर यांना कायम ठेवल्याने तसेच बहुतांश समित्यांची धुरा जेस्थांकडे दिल्याने पक्षात अंतर्गत विरोध सुरू आहे. तसेच गट पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचे दिसून येत आहे. याविषयी कोणी उघडपणे बोलत नसले तरी वस्तुस्थिती मात्र हीच आहे.
निवडणुका अवघ्या चार महिन्यांवर आल्या असताना पक्षाने त्यांच्या सर्व गट समित्या बरखास्त करून नेमके काय साधले हे येणारा काळ ठरवेल. पी चिदंबरम यांची नेमणूक केल्याने पक्षात चैतन्य आल्याचे सांगितले जात आहे. तसेच सर्व मतदार संघातून इच्छुकांची भाऊगर्दी झाल्याचे पक्षाकडून सांगितले जात असले तरी. हातात असलेल्या केवळ 4 महिन्यात पी चिदंबरम यांना फार काही करता येईल असे दिसत नाही. पक्षातील गटबाजी संपवणे सद्यस्थितीत अशक्य आहे. अन्य पक्षातून काँग्रेसमध्ये येणाऱ्या नेत्यांना स्थानिक पातळीवरच विरोध होत आहे. यावरून पक्षात मतभेद सुरू आहेत. शिवाय पक्षाच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी आपला जनाधार गमावला आहे. 2017 मध्ये संधी असूनही सरकार बनवण्यात अपयशी ठरल्याचा राग कार्यकर्ते आणि लोक अद्याप विसरलेले नाहीत. काँग्रेसच्या निष्क्रिय पणाचा लाभ अर्थातच भाजपने घेतला. आणि गेली साडेचार वर्षे राज्याचा कारभार व्यवस्थितपणे चालवला. कोरोना महामारी असूनही भाजप नेतृत्वाने आपल्या कामाची चुणूक दाखवून दिली. विशेष करून विद्यमान मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वात राज्य सरकार यशस्वीपणे कार्य करत आहे.
राज्यातील इतर विरोधी पक्ष खासकरून गोवा फॉरवर्ड, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मगो हे पक्ष काँग्रेसकडून युतीच्या आमंत्रणाची वाट पाहत बसले आहेत. आणि काँग्रेस नेते या नेत्यांना वाकुल्या दाखवत असल्याचे चित्र दिसत आहे. एकमेव मगो पक्ष सोडला तर राष्ट्रवादी आणि गोवा फॉरवर्ड या पक्षांना राज्यात फारसा जनाधार नाही. गोयं, गोयंकार आणि गोयांकरपण अशी भावनिक साद घालून गेल्या निवडणुकीत 3 जागा मिळवलेल्या पक्षाचा बनावट मुखवटा फाटला आहे. इन, मिन, तीन आमदारांच्या या पक्षातील विजय सरदेसाई वगळता अन्य दोन आमदार हवालदिल झाले आहेत. यामुळे इतर पक्षात जाता येईल का याची चाचपणी ते करत आहेत.
राष्ट्रवादीची ही वेगळी स्थिती नाही. एकमेव आमदार असलेल्या या पक्षातील राज्यस्तरीय नेते गेले साडेचार वर्षे अक्षरशः झोपले होते. आता निवडणुका जवळ येताच सर्वजण सक्रिय झाले असून काँग्रेसच्या आवतानाची प्रतीक्षा करत आहेत.
मगो पक्षाला थोडाफार जनाधार असला तरी दोन – तीन मतदारसंघ वगळता या पक्षाची ताकद अन्य ठिकाणी दिसत नाही. या पार्श्वभूमीवर भाजप जोमात आणि विरोधक कोमात असे म्हटले तरी वावगे ठरू नये…

Continue Reading