Connect with us

गोवा खबर

कॉंग्रेस निवडणुकीसाठी सज्ज २३ ते २६ जागा जिंकणार : चोडणकर 

Published

on

Spread the love
गोवा खबर : राज्यात कधीही होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसची जय्यत तयारी असून आम्ही २३ ते २६ जागा जिंकून लोकाभिमुख आणि स्थिर सरकार गोव्यात स्थापन करू, असा दावा गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी येथे केला.
आज पणजीत कॉंग्रेस भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत चोडणकर म्हणाले की, अखिल भारतीय कॉंग्रेस प्रभारींच्या गेल्या काही दिवसांच्या भेटीनंतर आम्ही अनेक मतदारसंघांना भेटी देऊन गट समिती बैठका घेतल्या. जिल्हा तसेच इतर संघटनांनी काम सुरू केले आहे. आम्ही जवळपास सर्वच मतदारसंघात तयारी केली आहे. सर्वसामान्यांसाठी प्रत्येक विषयावर आवाज उठविला आहे. इंधन दर वाढ आणि गॅस दर वाढ यावरही आंदोलन सुरू असून निवडणुकीची तयारीही चालू आहे.
काही माध्यम संस्थांनी आणि भाजपनेही नुकत्याच केलेल्या पाहणीत येणार्‍या निवडणुकीत भाजपचा पराभव अटळ असल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्व आघाड्यांवर अपयशी ठरलेला भाजप लोकांचे लक्ष भलतीकडे वळविण्यासाठी नौटंकी करत आहे. आरोग्य, अर्थ व्यवस्था आणि बेरोजगारी भाजपमुळे वाढली आहे. याच पाहणी मध्ये कॉंग्रेस पक्षाला गोव्यात २३ ते २५ जागा मिळतील असे सांगितले आहे. शिवाय भाजप उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड मधे पराभवाच्या छायेत आहे. या पाहणीतून हे स्पष्ट झाले आहे की, गोव्यात कॉंग्रेसच पुन्हा सत्तेत येणार आहे, असे चोडणकर म्हणाले.
दिवाळखोर भाजप सरकारने गोमंतकीय युवकांना नोकर्‍या देण्याची खोटी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली आहे. हे दुसरे काहीही नसून भाजपचे पैसे कमवा मिशन आहे. भाजपचे एजंट त्यासाठी आधीच  कामाला लागले असून बेरोजगार युवकांना नोकरीसाठी मोठ्या रकमा मागितल्या जात आहेत. हा झटपट पैसे मिळाविण्याचा मार्ग असला तरी भाजपला आपण पुन्हा सत्तेवर येण्याची खात्री नाही. हे सरकार निवडणुकीची पूर्व तयारी करायला देखील समर्थ नाही.
गोमंतकीयांनी सावध व्हावे आणि भाजपच्या पैसे कमवा रॅकेटला बळी पडू नये, असे आवाहन चोडणकर यांनी केले.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. या सरकारने  निरपराध कोरोना रुग्णांना ऑक्सिजन अभावी मारून टाकले आहे. राज्यातील विधवा, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्ती  यांच्यासाठी असलेल्या समाज कल्याण योजनांचे पैसे देण्यासाठीही सरकारकडे निधी उपलब्ध नाही. दुसरीकडे मुख्यमंत्री साखळी नगरपालिका मंडळाला विकास कामे करण्यापासून रोखत आहेत. आपल्या मतदारसंघातील सरकारी कर्मचार्‍यांना छळणे आणि त्यांच्या बदल्या करणे, यासाठी ते आपल्या पदाचा गैरवापर करीत आहेत. उदाहरण द्यायचे तर सूरज खांडेकर, गोपाळ देसाई, सर्वेश मांद्रेकर, डॉ. रूपचंद गावडे, विदेश केरकर आणि त्यांची पत्नी यांच्या बदल्या काणकोण, केपे, पेडणे या ठिकाणी करून पाठिंब्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांवर दबाव आणला जात आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना शरण जाऊ नये असे सांगत चोडणकर म्हणाले की, सावंत यांचा पराभव अटळ असून त्यांच्या या बदला घेण्याच्या वृत्तीने त्यांची मते आणखी कमी होणार आहेत.
केक वाटपाच्या एका पक्षाच्या कार्यक्रमावर बोलतांना चोडणकर म्हणाले, हा कार्यक्रम भाजपच्या सुपर सीएमने तयार करून दिला होता. कॉंग्रेस समर्थक मतदारांची दिशाभूल करणे आणि पक्षाची मत विभागणी करण्यासाठी भाजपनेच खेळलेला हा डाव आहे. हे केक मगोच्या फुटीर आमदारांना दिले गेले नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले. २७  मार्च २०१९ रोजी भाजपात प्रवेश केलेल्या मगो आमदारांचा हा दिवस भाजप आणि त्यांचे धुरीण सोयीस्करपणे विसरले आहेत. शिवाय बाबू कवळेकर आणि इतर पक्ष बदलुंच्या घरी जायला ही ते विसरले आहेत. काँग्रेसची पक्षबदलूंविरूध्दची कायदेशीर व राजकीय लढाई सुरूच राहील, आसे चोडणकर म्हणाले.

Continue Reading