गोवा खबर : महिला व बाल विकास संचालनालयाने लाडली लक्ष्मी योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणाऱ्या लाभाच्या वितरणावरून काही स्थानिक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेली बातमी पूर्णपणे चुकीची असून गोवा राज्यातील जनतेची दिशाभूल करणारी आणि राज्य सरकारची प्रतिमा मलीन करणारी असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
नोडल बँक (एचडीएफसी, स्टेट बँक ऑफ इंडिया) मध्ये ३७ कोटी आणि ४९ लाख रुपये जमा केल्यानंतर महिला आणि बाल विकास खात्याने जून महिन्यात लाडली लक्ष्मी योजनेचे ३७४९ अर्ज मंजूर केल्याची माहिती दिली.
५ जुलै २०२१ पासून मूळ कागदपत्रे बँकेत सादर केल्या गेलेल्या लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत त्यांच्या खात्यात जमा झालेल्या रकमेची पावती आधीच मिळाली आहे.

योजनेअंतर्गत सुलभ वितरणासाठी व मोठी गर्दी टाळण्यासाठी सदर खात्याने दररोज टोकन क्रमांक देणे सुरू केले आहे आणि त्यानुसार लाभार्थ्यांना वितरण प्रक्रियेसाठी विशिष्ट तारखेला बोलावण्यात आले आहे. वितरणाच्या दिवशी लाडली लक्ष्मी योजनेची मूळ कागदपत्रे लाभार्थ्याना दिली जातात जी लाभार्थ्यांना त्यांच्या संबंधित बँकेत सादर करावी लागतात. एकदा मूळ कागदपत्रे लाभार्थीच्या संबंधित बँकेत जमा झाल्यावर ही रक्कम लाभार्थी बँक खात्यात जमा केली जाते.
याशिवाय गृह आधार योजनेंतर्गत ६ जुलै २०२१ रोजी रू. १८, ०८, ०८,५०० एचडीएफसी बँकेत जमा केले आहेत आणि वितरण प्रक्रिया चालू आहे. फ्रेश प्रकरणांसाठी मामलेदारांचा उत्पन्न दाखला सादर करण्याची गरज नाही. संशयास्पद प्रकरणांसाठी मामलेदारांचा उत्पन्नाचा दाखला सादर करावा लागतो. या संशयास्पद अर्जांची यादी संबंधित तालुका मामलेदारांकडे अगोदरच उपलब्ध आहे.
सदर खात्याने अर्जदारांना घाबरू नका असे आवाहन केले आहे आणि पात्र असलेल्या प्रत्येक अर्जदारास योजनेंतर्गत लाभ मिळणार अशी माहिती दिली आहे.