Connect with us

गोवा खबर

ऑक्सीजनअभावी मृत्यू होऊन देखील गोमेकॉकडून खोटी माहिती देऊन पंतप्रधानांची दिशाभूल : शिवसेना

Published

on

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
गोवा खबर : बांबोळी येथील गोमेकॉ ऑक्सीजन अभावी झालेल्या मृत्युंचा विषय राज्यभर गाजला होता. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी न्यायालया मार्फत चौकशीची मागणी केली होती, तरीही असे काही झालेच नाही, असे उत्तर गोमेकॉ प्रशासनाने पंतप्रधान कार्यालयाला दिले असल्या बद्दल शिवसेना राज्यप्रमुख जितेश कामत यांनी आश्चर्य व्यक्त करत सरकार लोकांची दिशाभूल करून स्वतःच्या चुकांवर पांघरुण घालत आहे, असा आरोप देखील शिवसेनेने आज केला.
याबाबत अधिक माहिती देताना कामत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ई-मेल द्वारे पत्र लिहून गोवा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये रात्री दोन ते पहाटे सहा दरम्यान ऑक्सिजन कमतरतेमुळे होत असलेल्या मृत्यूंची सिबीआय मार्फत चौकशी करावी अशी मागणी केली होती. पंतप्रधान कार्यालयाने गोमेकॉत झालेल्या दुर्दैवी मृत्युंविषयी चौकशी केली असता, २ ते ६ दरम्यान असे काही घडलेच नसल्याची खोटी माहिती देण्यात आल्याचे कामत यांनी सांगितले.
कामत म्हणाले, पंतप्रधान कार्यालयातून पाठवलेल्या उत्तरात स्पष्ट लिहीले आहे की गोमेकॉकडे विचारपूस केली असता असं काही घडलंच नसल्याचे कळल्याने सदर तक्रार खोटी असून चौकशी बंद करत असल्याचे म्हटले आहे. सदर मृत्यू प्रकरणी न्यायालयात लोक हीत याचिकेवर सुनावणी चालू असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने आपण जास्त काही टिप्पणी करू शकत नाही. पण न्यायालयात कबुली दिली असून पंतप्रधान कार्यालयाला खोटी माहिती देण्यात आल्याचे कामत यांनी स्पष्ट केले.
 पंतप्रधान कार्यालयाला सर्व वर्तमानपत्राची कात्रणं पाठवून सुध्दा चौकशी बंद करत तक्रारदाराला खोटं ठरवणे म्हणजे अप्रत्यक्षपणे वर्तमानपत्रांनाही खोटं ठरवणे आहे असे मत कामत यांनी व्यक्त केले.
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी देखील सदर प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती, फरक येवढाच कि त्यांनी फक्त तोंडी तर आपण रीतसर तक्रार नोंदवली असे कामत यांनी सांगितले.
लाखो करोडो मेले तरी चालतील पण भाजप सरकार सत्तेत राहीला पाहिजे या तत्वावर सध्या केंद्र सरकार चालत असल्याची टीका कामत यांनी केली आहे.
जरी पंतप्रधान कार्यालयाने चौकशी बंद केली तरी त्याच तक्रारीची दखल घेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने केस नोंद केली असल्याची माहिती कामत यांनी दिली आहे.
दरम्यानसत्तरी तालुक्यातील पर्ये पंचायतीचे माजी उपसरपंच गुरुदास गावकर यांनी पणजी येथील मध्यवर्ती कार्यालयात शिवसेनेत प्रवेश केला. गोवा राज्य प्रमुख जितेश कामत यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. गावकर हे याआधी भाजपचे कार्यकर्ते होते. त्यांच्या सोबत त्यांचे निकटवर्तीय रामा राणे, सागर सावंत आणि प्रशांत सावंत यांनी प्रवेश केला.
 म्हापसा येथील उद्योजक वासिम शेख यांनी ही पक्षप्रवेश केला आहे. सत्तरी तालुका प्रमुख अर्जुन घाडी यांची जिल्हा सचिव पदी आणि संजय सावंत यांची मये मतदारसंघ प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेना विधानसभेच्या 25 जागा लढवणार
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत किमान २५ जागा लढवणार असल्याचे कामत यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना आगामी निवडणुकीत युती न करण्याची मागणी आपण केली असून त्यांनी ती मान्यही केली असल्याचे कामत यांनी सांगितले. युतीत शिवसेनेला कमी लेखत पक्षाला नको त्या जागा देण्याची पद्धत गोव्यात आहे. खासदारांचे संख्याबळ लोकसभेत तिसऱ्या क्रमांकावर असून शिवसेना देशातील बलाढ्य पक्ष असल्याचे मत कामत यांनी व्यक्त केले आहे. यावेळी शिवसेना आपली ताकद दाखवणार आहे आणि १५ मतदारसंघात बुथ रचना सुरू केली असल्याचे कामत यांनी सांगितले.
यावेळी सरचिटणीस मिलिंद गावस, राज्य चिटणीस मंदार पार्सेकर आणि शिवसैनिक महेश पेडणेकर हजर होते.

Continue Reading