Connect with us

गोवा खबर

मनुष्यबळ आणि कौशल्य विकासावरच भर

Published

on

Spread the love
आधुनिक गोव्याचे शिल्पकार आणि गोव्याच्या सर्वांगीण विकासाची प्रक्रिया ठामपणे पुढे नेणारे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा आज दुसरा स्मृतिदिन. त्यानिमित्त मनोहर पर्रीकर यांना आदरांजली वाहताना भविष्यातील गोव्याच्या वाटचालीची दिशा स्पष्ट करणारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लिहिलेला हा लेख.
भाई… मनोहर पर्रीकर हे नाव उच्चारताच अजूनही अंगावर रोमांच उभे राहतात. अंगातील रक्त सळसळते. नजरेसमोर उभे राहते ते स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गोव्याच्या हितासाठी अविश्रांत, अविरत धडपड करणारे व्यक्तिमत्व! भाईंच्या व्यक्तिमत्त्वात अगणित गुण दडलेले होते. प्रत्येक विषयाची आपल्याला सखोल माहिती असली पाहिजे आणि या माहितीचा उपयोग गोव्याच्या तसेच देशाच्या कल्याणासाठी झाला पाहिजे असा त्यांचा आग्रह असायचा. त्यांचा नेमका हा गुण मला व्यक्तिशः खूप आकर्षित करून घेतो. गोवा राज्याचा मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली त्या क्षणापासून आपल्या ज्ञानाचा आणि अधिकारांचा गोव्याच्या भल्यासाठी कसा उपयोग करून घेता येईल हा एकच ध्यास मला लागून राहिला आहे. त्याचबरोबर ज्या विषयांची अद्याप माहिती झालेली नाही त्यांची पुरेशी आणि सखोल माहिती करून घेण्यावर माझा भर असतो. या पद्धतीने काम करूनच मी गोव्याच्या हितासाठी कार्यरत राहून भाईंचा – मनोहर पर्रीकर यांचा वारसा पुढे नेऊ शकेन अशी मला खात्री वाटते.
गोव्याचे भाग्यविधाते भाऊसाहेब उर्फ दयानंद बांदोडकर यांनी मुक्तीनंतर गोव्याच्या विकासाचा पाया घातला. सर्व क्षेत्रांतील भक्कम पायाभरणीमुळेच गोव्याने पुढील प्रगतीची वाट चांगली पकडली. त्यानंतर आलेल्या अनेक सरकारांनी या प्रगतीच्या महामार्गावरून वाटचाल केली. त्यानंतर राजकारणात उगवलेल्या मनोहर पर्रीकररूपी ताऱ्याने आधुनिक गोव्याच्या सर्वांगीण विकासाचा रोल मॉडेल बनवला. विकासाच्या अनेक योजना राबवल्या. त्यांच्या कामाचा झपाटा एवढा जबरदस्त होता की, राजकीय विरोधक सुद्धा तो झपाटा बघून हतबल बनत असत. जाती-पातीच्या वाद-विवादांच्या बळावर निवडणुका लढवायचे दिवस इतिहासजमा करून आपल्या सरकारने केलेल्या विकासकामांच्या बळावर निवडणुका लढवून जिंकण्याचा पायंडा भाईंनी सुरू केला. राजकारणातून नकारात्मकता घालवून सकारात्मक राजकारण करण्याची आणि मान वर करून निवडणुकीला सामोरे जाण्याची परंपरा त्यांनी सुरू केली.
या अभिमानास्पद परंपरेचा मी एक पाईक आहे. भाईंच्या या भारावून टाकणाऱ्या सकारात्मक ऊर्जा निर्माण करणाऱ्या राजकारणातून वर आलेल्या काही व्यक्तिमत्त्वांपैकी मी एक आहे. म्हणून भाईंच्या राजकीय परंपरेचा वारसा जपण्याचा आणि नेटाने पुढे नेण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आतापर्यंत राहिला आहे, यापुढेही तसाच असेल.
गोव्याच्या विकासाचा विचार करत असताना भाई सर्वच क्षेत्रांना समाविष्ट करून घेत असत, सर्वच क्षेत्रांचा प्रामुख्याने विचार करत असत. त्यातही विशेष नमूद करायचे झाल्यास शिक्षण आणि पायाभूत सुविधा हे दोन विषय त्यांच्या हृदयाच्या अधिक जवळचे होते. शिक्षण क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी पावले उचलली. भाऊसाहेबांनी जसा प्राथमिक शाळा सुरू करण्यावर भर दिला, तसा भाईंनी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या मोडकळीस आलेल्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी, शाळांच्या तसेच महाविद्यालयांच्या नवीन इमारती बांधण्यासाठी सरकारी योजना बनवल्या, राबवल्या. या योजनांच्या अंतर्गत कोट्यवधी रुपयांचे अनुदान दिले. आज ऑनलाईन शिक्षण, ई लर्निंग, डिजिटल मीडिया हे शब्द परवलीचे बनले आहेत. दूरदृष्टीच्या भाईंनी विद्यार्थ्यांसाठी सायबरेज योजना दोन दशकांपूर्वी आणली. यामुळे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून घरोघर संगणक पोहोचले. ई साक्षरतेची ती सुरुवात होती.
याचबरोबर भाईनी नवीन पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर सर्वोच्च प्राधान्याने भर दिला. इफ्फी या नावाने प्रसिद्ध झालेला भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात भरवण्याच्या जिद्दी पोटी त्यांनी २००४ मध्ये केवळ चार ते सहा महिन्यांच्या काळात झपाट्याने कामे केली. मल्टिप्लेक्स आणि नवीन पाटो पुलाची उभारणी करण्याबरोबरच कला अकादमीचे नूतनीकरण, पणजी शहराचे सौंदर्यीकरण केले. भाईंच्या या कामांचा उल्लेख वारंवार होतो, पण त्याचबरोबर भाईंच्या पुढाकारातून कित्येक पूल, रस्ते, इमारती, स्टेडियम, रुग्णालये, शाळा उभ्या राहिल्या हेही गोवेकर विसरलेले नाहीत.
शिक्षणाबरोबरच पायाभूत सुविधांचा विकास हा भाईंचा ध्यास होता. शिक्षण आणि पायाभूत सुविधांबरोबरच इतर महत्त्वाच्या क्षेत्रातील विकासाची प्रक्रिया चालूच राहिली पाहिजे. केंद्रातील नरेंद्र मोदी जी यांच्या पंतप्रधानपदाखालील सरकारच्या सर्वतोपरी सहकार्याने गोव्याला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर नेण्याचा माझा प्रयत्न आहे. हे करत असताना भविष्यात होणाऱ्या प्रगतीचा, विकास योजनांचा खऱ्या अर्थाने फायदा घेण्यासाठी गोव्यात युवक-युवतींची शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रगती झालेली असली पाहिजे असे माझे मत आहे. माझ्या सरकारच्या योजनांचा खरा लाभ माझ्या गोवेकर युवक-युवतींना मिळणार नसेल तर काय फायदा? म्हणून मनुष्यबळ विकास व कौशल्य विकास यावर माझा आता सर्वाधिक भर आहे.
शैक्षणिक, औद्योगिक, सामाजिक व इतर क्षेत्रांच्या प्रगतीतून यापुढे सातत्याने नवीन नोकऱ्या निर्माण होत राहतील. या नोकऱ्या सरकारी क्षेत्राबरोबरच खासगी क्षेत्रांतही मोठ्या प्रमाणावर तयार होतील. त्याचबरोबर नवनवीन क्षेत्रांत स्वयंरोजगाराला खूप मोठा वाव आहे. स्वयंरोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर तयार होत आहेत. नवीन स्टार्ट-अप, मोठ्या उद्योगांना पूरक छोटे उद्योग, व्यवसाय अशी या स्वयंरोजगाराच्या संधींची व्याप्ती खूप मोठी आहे. या सर्व संधीचा फायदा उठवण्यासाठी आणि नवीन संधी निर्माण करण्यासाठी मनुष्यबळ विकास तसेच कौशल्य विकास हे सूत्र यापुढे फार महत्त्वाचे ठरणार आहे. माध्यमिक आणि उच्च शिक्षणात तसेच तंत्र आणि व्यावसायिक शिक्षणात मनुष्यबळ विकास व कौशल्य विकास यावर भर देणारे अभ्यासक्रम आणि विषय समाविष्ट करण्याची प्रक्रिया माझ्या सरकारने सुरू केली आहे. नजिकच्या भविष्यकाळात या प्रयत्नांचे फलित दिसू लागेल अशी मला खात्री वाटते.
गोव्यात जिथे जिथे नवीन रोजगाराची, नोकरीची तसेच व्यवसायाची संधी उपलब्ध होते तिथे तिथे गोमंतकीय तरुण तरुणी त्या संधीचे चीज करण्यासाठी तयार असले पाहिजेत असा माझा आग्रह आहे. त्यासाठी आवश्यक असलेले तंत्रशिक्षण, कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याचा माझ्या सरकारचा प्रयत्न आहे. राज्यात ठिकठिकाणी पायाभूत सुविधांची कामे चालू आहेत. या कामांतून निर्माण होणाऱ्या नोकऱ्या आणि व्यवसाय संधीही गोमंतकीयांनाच मिळव्यात असे माझे स्वप्न आहे. मनुष्यबळ विकास आणि कौशल्य विकास यावर भर देऊनच हे स्वप्न प्रत्यक्षात येऊ शकेल. म्हणून विद्यार्थ्यांनी, युवक-युवतींनी नियमित शिक्षणाबरोबरच आपल्या व्यक्तिमत्व विकासावर भर द्यावा. विविध कौशल्य प्राप्त करून घेण्याकडे लक्ष द्यावे. माझ्या सरकारतर्फे हाती घेण्यात येत असलेल्या कौशल्य विकास प्रशिक्षण उपक्रमांचा अधिकाधिक उपयोग करून घ्यावा असे माझे गोमंतकीय युवा पिढीला कळकळीचे आवाहन आहे.
स्व. मनोहर पर्रीकर म्हणजेच आमचे लाडके भाई यांनी आम्हाला प्रगतीचे स्वप्न दाखवले. फक्त स्वप्न दाखवून ते थांबले नाही, तर सर्वांगीण प्रगतीचे स्वप्न साध्य करण्यासाठी पुढची पावले टाकली. गोव्याच्या आणि गोवेकरांच्या प्रगतीचा ध्यास घेऊन अखंड धडपड केली. ही धडपड मनुष्यबळाच्या विकासाच्या माध्यमातून, सर्वांगीण प्रगतीच्या वाटेने आणखी पुढे नेऊन गोव्याला देशातील एक आघाडीचे प्रगतशील राज्य बनवूया. तुमच्या सगळ्यांच्या साथीने, सर्वांना बरोबर घेऊन हे ध्येय साध्य करण्याचा माझा प्रयत्न आहे. हे प्रयत्न कोणत्याही परिस्थितीत तडीस नेण्यासाठी मी सतत धडपड करीन हे वचन स्व. भाईंच्या दुसऱ्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने गोवेकरांना इथे देतो. स्व. भाई उर्फ मनोहर पर्रीकर यांना माझी मनःपुर्वक आदरांजली.
– डाॅ. प्रमोद सावंत
मुख्यमंत्री, गोवा राज्य

Continue Reading