Connect with us

गोवा खबर

गोव्याच्या प्रगतीची आणि विकासाची राष्ट्रपतीकडून प्रशंसा

Published

on

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

गोवा खबर:भारताचे राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद यांनी गोवा राज्याने मुक्तीनंतर विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात भरीव प्रगती साधल्याचे सांगितले आणि सर्व सरकारांच्या प्रयत्नाने ते साध्य झाल्याचे सांगितले. गोव्यात भेट दिल्यानंतर राष्ट्रपतीनी ६० व्या गोवा मुक्ती समारंभाच्या वर्ष भराच्या कार्यक्रमाचा पणजी येथील दयानंद बांदोडकर मैदानावर शुभारंभ केला.

राष्ट्रपतीनी गोव्याने शिक्षण, माहिती व तंत्रज्ञान, उद्योग अशा विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा उल्लेख केला तसेच गोव्याने दरडोई उत्पन्नामध्ये देशात अग्रक्रमांक पटकविल्याचे सांगितले.

सदर कार्यक्रमास भारताच्या प्रथम महिला श्रीमती सविता कोविंद, राज्यपाल श्री. भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रिय आयुष मंत्री श्री. श्रीपाद नाईक, शिष्टाचार मंत्री श्री. माविन गुदिन्हो आणि विरोधी पक्षनेते श्री. दिगंबर कामत उपस्थित होते.

गोव्याच्या स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीचा वेध घेऊन राष्ट्रपतीनी कोविड-१९ महामारीनंतर राष्ट्राच्या राजाधानी बाहेर केवळ दुसर्‍या सार्वजनिक कार्यक्रमास उपस्थिती लावल्याचे सांगितले.

त्यांनी गोव्याच्या मुक्तीसाठी स्वातंत्र्य सैनिक व हुतात्म्यांनी दिलेल्या योगदानाची आठवण करून दिली. क्रांतिकारक डॉ. राम मनोहर लोहिया यांनी स्वातंत्र्यासाठी पोर्तुगीज राजवटीविरूध्द लढा देण्यासाठी गोव्यातील लोकांना एकत्र येण्याची हाक दिली होती. त्यानी लोकांना सरकारच्या प्रयत्नांना हातबार लावण्याचे आवाहन केले.

गोव्याचे राज्यपाल श्री. भगतसिंग कोश्यारी यांनी गोव्यातील स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सैनिक व हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. गोवा सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करीत असल्याचे त्यानी सांगितले.

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वर्षभर कार्यक्रमाचे आयोजन करून ६० वा गोवा मुक्ती दिन साजरा करणे म्हणजे केवळ मनोरंजन नसून तर कृषी, शिक्षण, उद्योग आणि वाणिज्य असा क्षेत्रात भावी विकासाचा आराखडा तयार करण्यासाठी प्रक्रिया सुरू करणे असल्याचे सांगितले आहे.

केंद्रिय आयुष मंत्री श्री. श्रीपाद नाईक यांनी गोव्यामध्ये कृषी, मत्स्योद्योग आणि वैद्यकीय पर्यटन अशा क्षेत्रात भरीव प्रगती साधण्याचे सामर्थ्य असल्याचे सांगितले.

विरोधी पक्षनेते श्री. दिगंबर कामत यांचेही यावेळी भाषण झाले.

सदर कार्यक्रमानंतर गोव्यातील कलाकारांनी पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. अभिनेत्री श्रीमती वर्षा उसगावकर आणि डॉ. दयानंद राव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शिष्टाचार मंत्री श्री. माविन गुदिन्हो यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

Continue Reading