Connect with us

जनमत

लोकशाहीची निरर्थकता आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता !

Published

on

Spread the love
रामनाथी, गोवा येथे जून 2018 मध्ये होणार्‍या सप्तम् अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या निमित्ताने…
अलीकडच्या काळातील आदर्श राज्यकर्ता म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचे उदाहरण देतो. महाराजांनी अठरा पगड जातींना एकत्र करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. दुसरीकडे आजची परिस्थिती पहाता निधर्मी लोकशाही प्रत्येक क्षेत्रात सपशेल अयशस्वी ठरली आहे. या पार्श्‍वभूमीवर आदर्श राज्यकारभारासाठी लोककल्याणकारी हिंदु राष्ट्राची स्थापना हाच आजच्या एकूण परिस्थितीवर एकमात्र उपाय आहे. सध्याची निधर्मी लोकशाही असलेल्या भारताची दु:स्थिती आणि ती सुधारण्यासाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची अपरिहार्यता, याचा नेमकेपणाने वेध घेणारा हा लेख !
1. स्वार्थी शासनकर्त्यांमुळे जातीजातींत विभागलेल्या हिंदूंना एकत्र आणण्यासाठी हिंदु राष्ट्राची आवश्यकता !
इंग्रज भारतात येण्यापूर्वी हिंदू एकोप्याने रहात होते; मात्र इंग्रजांच्या काळात फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब करून त्यांनी हिंदूंना विविध जातींमध्ये विभागले. स्वातंत्र्यानंतर देशातील शासनकर्त्यांनी भारताच्या मानगुटीवर आरक्षणाचे भूत बसवले. यामुळे समाजात एकोपा निर्माण होण्याऐवजी जाती-जातींत तेढ निर्माण झाली. निवडणुका आल्या की, राजकीय पक्ष विविध जातींना आरक्षणाचे गाजर दाखवून आपली राजकीय पोळी भाजून घेऊ लागले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मागास समाजाच्या विकासाला चालना मिळावी, यासाठी केवळ 10 वर्षांसाठी लागू केलेले आरक्षण देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे उलटून गेल्यानंतरही चालूच आहे.
वर्ष 1935 च्या जनगणनेनुसार भारतात मागास जातींची संख्या 150 होती. 21 व्या शतकात ती 3  सहस्र 500 च्या वर गेली. खरेतर मागासलेपणा जाणे म्हणजे राष्ट्राची प्रगती असते; परंतु सध्याला अनेक लोक स्वत:च्या समाजाला मागास घोषित करण्यासाठी आंदोलने, मोर्चे काढून आरक्षणाची मागणी करत आहेत, प्रसंगी कायदा हातात घेत आहेत. या आरक्षणामुळे गुणवंतांचे खच्चीकरण होऊन राष्ट्राची अपरिमित हानी होत नाही का ? थोडक्यात नि:स्वार्थी समाज निर्माण करण्यात नि सर्वप्रथम राष्ट्राचा विचार करण्याची शिकवण देण्यात लोकशाही अपयशीच ठरली, असे म्हटल्यास त्यात वावगे वाटण्याचे कारण नसावे. वसुधैव कुटुम्बकम् ।ची शिकवण देणार्‍या हिंदु राष्ट्रातच नि:स्वार्थ समाजनिर्मिती होणे शक्य होईल.
 
2. जनतेच्या पैशांचा राष्ट्रकार्यासाठी सदुपयोग करणारे प्रामाणिक शासनकर्ते आणण्यासाठी हिंदु राष्ट्राची आवश्यकता
पूर्वीच्या काळी जनता धर्माचरणी असल्याने ती सदाचारी आणि नीतीमान होती. निधर्मी लोकशाहीत राष्ट्राचे हे नैतिक बळ क्षीण झाले आहे. भ्रष्टाचारामुळे समाजव्यवस्था पोखरली आहे. एकेकाळी सोन्याचा धूर निघणारा आपला भारत देश आज निष्क्रीय आणि भ्रष्ट शासनकर्त्यांमुळे कर्जाच्या डोंगराखाली अडकला आहे. वर्ष 2015 च्या अंती देशाने आंतरराष्ट्रीय बँका, वित्तसंस्था, सरकारे यांच्याकडून 475.8 अब्ज डॉलर इतके कर्ज घेतले आहे. त्यात अब्जावधी रुपयांचे नवनवीन घोटाळे प्रतिदिन उघड होत आहेत. काँग्रेसच्या काळात झालेला आदर्श घोटाळा, २-जी स्पेक्ट्रम घोटाळा, कोळसा घोटाळा यांनी देशाची आर्थिक स्थिती डबघाईला आली असतांना आता बँकांकडून सहस्त्रो कोटी रुपयांचे कर्ज घेऊन ते बुडवणार्‍या विविध उद्योजकांचेे घोटाळेही समोर येऊ लागले आहेत.
किंगफिशर या आस्थापनाचे मालक विजय मल्ल्या यांनी विविध बँकांकडून 9 सहस्त्र कोटी रुपयांचे कर्ज घेऊन, तर हिरे व्यापारी नीरव मोदी यांनी पंजाब नॅशनल बँकेकडून 11 सहस्त्र 400 कोटी रुपयांचे कर्ज घेऊन ते बुडवले. दोघांनीही भारतातून पलायन केले आणि आता ते परदेशात ऐशोरामाचे जीवन जगत आहेत. याउलट भारतातील शेतकर्‍यांना मात्र शेतीसाठी बँकांकडून घेतलेल्या केवळ 10-20 सहस्त्र रुपयांच्या कर्जामुळे आत्महत्या करावी लागत आहे. ही स्थिती केवळ आध्यात्मिक पाया असलेल्या आदर्श अशा हिंदु राष्ट्रामुळेच बदलता येऊ शकते.
 
3. जनतेच्या रक्षणासाठी हिंदु राष्ट्राची आवश्यकता !
देशाच्या अंतर्गत शत्रूंपासून जनतेचे रक्षण करण्याचे दायित्व पोलिसांचे असते; मात्र सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद मिरवणार्‍या पोलिसांना त्याचा विसर पडलेला दिसतो. पोलीस आणि गुन्हेगार यांच्यातील अर्थपूर्ण हितसंबंधांमुळे गुन्हेगारांवरील पोलिसांचा वचक संपत चालला आहे. पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन जाणार्‍यालाच दमदाटी केली जाते. पोलीसच कारागृहातील गुन्हेगारांना सर्वतोपरी साहाय्य करत असल्याचे अनेकदा उघड झाले आहे, तसेच कायद्याचे रक्षक असलेले पोलीसच कायदा हातात घेऊन त्याचा खून पाडत आहेत, याचा अनुभवही अनेकांनी घेतला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांंच्या हिंदवी स्वराज्यात रयतेला त्रास देणार्‍यांना कडेलोटासारखी कठोर शिक्षा होत असे. स्त्रियांकडे वक्रदृष्टीने पहाणार्‍यांचा चौरंगा केला जात असे. त्यामुळे गुन्हा करणार्‍यांवर वचक बसून ते गुन्हा करण्यास धजावत नसत. याउलट निधर्मी भारतात जनतेचे रक्षण करण्यासाठी नेमलेेले पोलीसच गुन्हेगारांशी हातमिळवणी करून जनतेला त्रास देत आहेत. ही परिस्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे.
 
4. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी हिंदु राष्ट्राची आवश्यकता !
ज्ञानदानाचे कार्य हे अत्यंत पवित्र मानले जाते. पूर्वी तक्षशिला, नालंदा आदी विद्यापिठांतून केवळ भरतखंडातीलच नव्हे, तर युरोप आणि आशिया खंडातील विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात असे; मात्र विद्येचे माहेरघर असलेली भारताची शिक्षणप्रणाली आता कुचकामी ठरली आहे. प्राथमिक शिक्षणापासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंतच्या प्रवेशासाठी प्रवेशशुल्काच्या नावाखाली मोठी खंडणीच मागितली जाते. ज्यांच्याकडे गुरु म्हणून पाहिले जाते, ते शिक्षकच विद्यार्थ्यांवर अत्याचार करू लागले आहेत, याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. या परिस्थितीला मेकॉले शिक्षणप्रणाली कारणीभूत असून आदर्श शिक्षक आणि आदर्श शिष्य हे केवळ गुरुकुल शिक्षणपद्धतीतच घडू शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिशाहीन बनवणारी मेकॉले शिक्षणपद्धत हटवून ज्ञानदानासारख्या पवित्र क्षेत्रात भारताला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना आवश्यक आहे.
 
5. भारताच्या वास्तविक विकासासाठी हिंदु राष्ट्रच आवश्यक !
प्राचीन भारतात सनातन वैदिक हिंदु धर्माला राजाश्रय असल्याने हे राष्ट्र व्यावहारिक अन् आध्यात्मिक दृष्टीने प्रगतीपथावर होते. त्यामुळे सुसंस्कृत समाज, आदर्श कुटुंबव्यवस्था आणि राज्यकर्ते यांची निर्मिती हिंदु धर्माधिष्ठित राष्ट्रात झाली होती; मात्र भारतात स्वातंत्र्याच्या 7 दशकांनंतरही निधर्मी लोकशाही पद्धतीचा उदो उदो करणार्‍या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना सुसंस्कृत समाज अन् समृद्ध राष्ट्र घडवणे शक्य झाले नाही. परिणामी राष्ट्रात विविध समस्या जटील बनल्या असून यामुळे राष्ट्र झपाट्याने विनाशाकडे चालले आहे. या समस्यांची तीव्रता पहाता निधर्मी लोकशाहीची निरर्थकता आणि हिंदु राष्ट्र स्थापन करण्याची आवश्यकता स्पष्ट होते.
 
6. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सप्तम् अखिल भारतीय हिंदू अधिवेशन !
एकंदरीतच तथाकथित निधर्मी लोकशाहीमुळे भारताची मोठी हानी होत असून त्यासाठी आदर्श असे हिंदु राष्ट्र स्थापन करणे आवश्यक बनले आहे. याच पार्श्‍वभूमीवर वर्ष 2012 मध्ये हिंदु जनजागृती समितीनेे अखिल भारतीय हिंदू अधिवेशन ही संकल्पना मांडली अन् मूर्त रूपात साकारही केली. एकाच ध्येयाने प्रेरित झालेल्या शेकडो लहान-मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे हिंदू अधिवेशन प्रतिवर्षी गोवा येथे भरत आहे. हिंदु राष्ट्राच्या दृष्टीने देश-विदेशातील हिंदुत्वनिष्ठांचे संघटन करणारे हे एकमेव अधिवेशन आहे. यावर्षी 2 ते 12 जून या कालावधीत गोवा येथे हे सप्तम् अखिल भारतीय हिंदू अधिवेशन भरणार असून यात देशभरातील तसेच बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका इत्यादी देशांतील 250 हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या अधिवेशनात केवळ हिंदुत्वनिष्ठ नेतेच नाहीत, तर धर्माचार्य, संत, महंत, अधिवक्ता, निवृत्त न्यायाधीश, विचारवंत, पत्रकार, डॉक्टर, स्वरक्षण प्रशिक्षण तज्ञ यांचा समावेश असणार आहे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि संप्रदाय यांसह प्रत्येक क्षेत्रातील हिंदूंचे संघटन करणे, हा अधिवेशनाचा प्रमुख उद्देश असणार आहे.
या अधिवेशनातून प्रेरणा घेऊन कार्यतत्पर असलेले राष्ट्र नि धर्मप्रेमी हे देशाला हिंदु राष्ट्राच्या सुवर्ण युगाकडे घेऊन जाण्यासाठी आणखी एक पाऊल उचलतील. हे भगीरथ प्रयत्नच पुढे राष्ट्र आणि धर्म यांच्यावर आलेले जाळे दूर करून अनादी-अनंत अशा हिंदु धर्माची नि हिंदु राष्ट्राची सोनेरी किरण या भूतलावर पाडून संपूर्ण विश्‍वाला दिपवून टाकील, हे सुनिश्‍चित आहे.
  
अरविंद पानसरे,
    प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती
       संपर्क क्र. 7400339022

Continue Reading