Connect with us

जनमत

नैतिक देखरेखीची आवश्यकता !

Published

on

Spread the love
गेल्याच आठवड्यात श्रीराम सेनेचे संस्थापक  प्रमोद मुतालिक आणि श्रीराम सेनेचे अन्य २४ कार्यकर्ते यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली. या सर्वांवर मंगळुरू येथील एका पबवर आक्रमण केल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता. पबमध्ये विदेशी विकृतीच्या विळख्यात अडकून तरुणींचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये, या हेतूने काही कार्यकर्त्यांनी पबमधील मुलींना बाहेर काढले होते; पण या घटनेचे विपर्यस्त वार्तांकन करत प्रसिद्धीमाध्यमांनी हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले. हिंदुत्वनिष्ठांची ‘गुंड’ म्हणून यथेच्छ हेटाळणी केली.
 
संस्कृतीरक्षकांचा उपहास
 
    या प्रकरणी व्यक्तीस्वातंत्र्य आणि विहारस्वातंत्र्य यांचा उदोउदो करतांना पाश्‍चात्त्य विकृती कशी बळकट होईल आणि भारतीय संस्कृतीविषयी न्यूनगंडत्वाची भावना कशी निर्माण होईल, याची पुरेपूर दक्षता माध्यमांनी घेतली. त्यामुळेच समाजमन निर्माण करण्यात महत्त्वाचा वाटा असलेली ही प्रसारमाध्यमे (अपवाद वगळता) विदेशी हस्तकांच्या दावणीला बांधली गेली आहेत कि काय, ही शंका निर्माण झाली. कार्यकर्त्यांच्या निर्दोषत्वाच्या घटनेनंतरही ही शंका टिकून आहे; कारण निर्दोषत्व सिद्ध होऊनही माध्यमांकडून संस्कृतीरक्षकांचा उपहास चालूच आहे. 
 
कृतीमागचा उद्देश महत्त्वाचा 
 या प्रकरणी पबमधील मुलींना बाहेर काढले गेले, ते वैयक्तिक मानापमान अथवा द्वेष म्हणून नाही, तर पबमध्ये नाचतांना त्या वहावत जाऊन त्यांचे चारित्र्य कलंकित होऊ नये म्हणून ! या पबमधील काही मुलींच्या मातांनीही या प्रकरणी श्रीराम सेनेचे जाहीर आभार मानले होते. कुठल्या पालकांना त्यांच्या मुलीने पबमध्ये जाऊन मुलांसह दारू प्यावी आणि गाण्यांवर नाचावे, असे वाटेल ! विदेशी विकृतीला विरोध करण्याच्या कार्यकर्त्यांच्या पद्धतीवर चर्चा होऊ शकते; पण त्यांच्या उद्देशात कुणी खोट काढू शकत नाही, हे संस्कृतीरक्षकांना तालिबानी म्हणून हिणवणार्‍यांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. या सगळ्या प्रकरणाकडे खरे तर पालकत्वाच्या दृष्टीकोनातून पहायला हवे होते. एखादा मुलगा अभ्यास करत नसेल, तर पालक केवळ त्याला समजावून सांगत नाहीत; तर प्रसंगी त्याला शिक्षाही करतात. अशा वेळी कुणी विद्यार्थ्याच्या व्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच होत असल्याचे म्हणत नाही. मग संस्कृतीरक्षकांच्या काहीशा आक्रमक वाटणार्‍या कृती तालिबानी ठरवण्याचा प्रयत्न कशासाठी आणि कुणाच्या सांगण्यावरून होत आहे ? धर्म, संस्कृती, देश आणि समाज यांच्या रक्षणासाठी साम, दाम, दंड आणि भेद या नीतींचा वापर भारतात पूर्वापार होत आला आहे. केवळ उथळ प्रसारमाध्यमे त्या काळी नसल्याने समाजहितकारक कृतींवर थयथयाट केला जात नव्हता एवढेच !  
 
खरे गुन्हेगार कोण ?
 या प्रकरणातून निर्दोष मुक्त झाल्यानंतर श्री. प्रमोद मुतालिक यांनी ‘सत्याचा विजय झाला’, अशी प्रतिक्रिया दिली, तसेच त्या दिवशी ते घटनास्थळी उपस्थित नसतांनाही त्यांना या प्रकरणात गोवल्याप्रकरणी तत्कालीन भाजप सरकारवर ताशेरे ओढले. ‘या घटनेमागे ड्रग माफिया आणि सेक्स माफिया होते’, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. या आरोपाचीही सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. तरुण मुलींच्या चारित्र्याच्या मोबदल्यात सेक्स रॅकेट आणि अमली पदार्थ यांचा धंदा नीट चालावा म्हणून पबची विकृती उभी रहात असेल आणि पबला विरोध करणार्‍यांनाच विरोध होत असेल, तर खरे गुन्हेगार कोण हे निराळे सांगायला नको. 
 
नैतिक देखरेख आवश्यकच !
 स्त्री-मुक्तीवाले, समानतावाले यांनी नैतिक देखरेखवर (‘मॉरल पोलिसिंग’वर) कितीही आक्षेप घेतला, तरी संस्कृतीच्या रक्षणासाठी काही आचारसंहिता असणे आवश्यक आहे. वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून लोक सिग्नल पाळायला तयार असतात, तर समाजस्वास्थ्य चांगले रहाण्यासाठी काही सामाजिक आणि नैतिक बंधने पाळण्यास काय हरकत आहे ? स्वातंत्र्य आणि स्वैराचार यांमधील भेद समजून न घेतल्यानेच समाजाची भरकटलेली स्थिती झाली आहे. आज जगभरात भारतीय संस्कृतीचे अनुयायी वाढत असतांना भारतात मात्र पुढारलेपणाच्या नावाखाली सार्वजनिक ठिकाणी अश्‍लीलतेचे प्रदर्शन, रस्त्यारस्त्यांवर ‘किस ऑफ लव्ह’ चळवळ राबवणे, असे प्रकार होत आहेत. हे म्हणजे हिरा टाकून कोळसा विकत घेण्यासारखेच आहे. 
 
निकालानंतरचे प्रश्‍न 
 या प्रकरणी हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना न्यायालयाकडून निर्दोष म्हणून घोषित केले गेले असले, तरी गेली ९ वर्षे कार्यकर्त्यांची आणि संघटनेची झालेली अपकीर्ती याला उत्तरदायी कोण ? कार्यकर्त्यांना झालेल्या शारीरिक आणि मानसिक त्रासाची भरपाई कशी होणार ? या प्रकरणावरून श्री. मुतालिक यांना गोव्यात येण्यास घातलेली बंदी सरकार उठवणार का, हे प्रश्‍न उरतातच. म्हणूनच या पार्श्‍वभूमीवर श्री. मुतालिक आणि श्रीराम सेना यांची मानहानी केल्याप्रकरणी तत्कालीन भाजपचे राज्य सरकार आणि काँग्रेसचे केंद्र सरकार यांच्या विरोधात दावा दाखल करण्याचा श्री. मुतालिक यांचा विचार महत्त्वपूर्ण आहे. अशाने निरपराध हिंदूंना विनाकारण छळणार्‍या आणि दायित्वशून्य वार्तांकन करून त्यांचे वैयक्तिक आयुष्यही कलुषित करणार्‍यांना चाप बसेल. 

– श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था.

संपर्क : 7775858387 
टिप:लेखात व्यक्त झालेले मत लेखकाचे आहे.संपादक त्याच्याशी सहमत असतील असे नव्हे.

Continue Reading