गोवा खबर

आपली राज्यघटना केवळ कायदेशीर दस्तऐवज नाही : राज्यपाल

Published

on

Spread the love

गोवा खबर : आपली राज्यघटना केवळ कायदेशीर दस्तऐवज नाही तर न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या मूल्यांचा जिवंत पुरावा आहे असे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांनी ताळगाव येथे आयोजित राज्यस्तरीय ७६ व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात बोलताना सांगितले. 

राज्यपालांनी पुढे बोलताना या स्मारकाच्या कार्याचे प्रमुख शिल्पकार डॉ. बी.आर. आंबेडकर यांनी या महान संविधान सभेच्या सहभागाने विविधतेतील एकता टिकवून ठेवण्यासाठी आणि या महान राष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला सक्षम करण्यासाठी आपल्याला या रचनेची भेट दिलीअसे सांगितले.

राज्यपाल पुढे बोलतांना म्हणाले की या प्रजासत्ताक दिनी आपण आपल्या देशाच्या स्वातंत्र्य, एकता आणि अखंडतेसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना आणि हुतात्म्यांना अभिवादन करून आपल्याला सुरक्षितता देणाऱ्या आपल्या सशस्त्र दल, पोलीस आणि नागरी सेवांतील शूर स्त्री-पुरुषांबद्दल कृतज्ञता व्यक्त करूया.

राज्य सरकारच्या कामगिरीवर प्रकाश टाकत राज्यपालांनी रस्ते, रेल्वे, विमानतळ आणि पूल अशा पायाभूत सुविधा उपलब्ध करून देऊन गोव्याच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी सरकार कौतुकास्पद काम करीत आहे असे सांगितले. परकीय सत्तेतून मुक्त होऊन १९६१  साली गोवा भारतीय प्रजासत्ताक व्यवस्थेत सामील झाले. तेंव्हापासून  गोव्याची प्रगतीशील राज्य म्हणून पुढे वाटचाल सुरू झाली.  गोवा राज्य आपली सौंदर्य, संस्कृती आणि लोकांमधील सलोख्यासाठी प्रसिध्द आहे. सध्याचे राज्य सरकार रस्ते, रेल्वे, विमानतळ, पूल अशा साधनसुविधां उपलब्ध करून गोव्याची प्रगती आणि विकासासाठी प्रशसनिय कामगिरी करीत आहे. यावर्षी पेडणे तालुक्यातील मोपाच्या मनोहर पर्रीकर विमानतळास उत्कृश्ट डॉमेस्टिक विमानतळ म्हणून पुरस्कार प्राप्त झाला असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

राज्य सरकारची प्रशंसा करताना राज्यपालांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली  गोवा राज्य  गतीने विकासाची कामे करते.  उत्कृष्ट सेवा आणि प्रशासनातून गोवा हे स्वयंपूर्ण, आत्मनिर्भर राज्य करण्याच्या उद्देशाने गोंवा सरकारने भारत सरकारच्या आत्मनिर्भर भारत-गरीब कल्याण कार्यक्रमाच्या धर्तीवर “स्वयंपूर्ण गोंय” अभियान सुरू केले आहे. गावांचा विकास साधून ग्रामीण अर्थ व्यवस्था सुधारणे हा या कार्यक्रमाचा एकमेव उद्देश आहे. प्रत्येक गोमंतकीयांच्या जीवनात परिवर्तन आणून गोवा आत्मनिर्भर करण्यासाठी सरकार अंत्योदय, सर्वोदय आणि ग्रामोदय तत्वावर काम करते. सरकारच्या योजना/सेवा प्रत्येक नागरिकांपर्यंत पोचविण्यासाठी स्थानिक संस्था, सरकारी विभाग आणि स्वयंपूर्ण मित्रांच्या सहकार्याने विशेष उपक्रम राबविम्यात येतात असे राज्यपालांनी पुढे बोलताना सांगितले.

राज्यपाल म्हणाले गोव्यातील लोक शांतताप्रिय आणि मैत्रीपूर्ण आहेत. गोव्यात विविध समुदाय संपूर्ण एकोप्याने एकत्र राहतात.अलौकीक सौंदर्याने गोव्याला जगातील प्रसिध्द पर्यटन स्थळ केले आहे.  गोवा हे आकाराने देशांतील एक ल्हान राज्य असले तरी देशांतील अधिक दरडोई उत्पन्न असलेले राज्य आहे. गोवा हे भरभराटीचे राज्य आहे. देशांत गोव्याच्या आर्थिक विकासाचे प्रमाण अधिकक आहे. गोवा राज्य रस्ते, रेल्वे, जल मार्ग तसेच विमान वाहतूकीव्दारे मुख्य शहर आणि  व्यापार तसेच वाणिज्य केंद्रांस जोडलेले आहे असे राज्यपालांनी  सांगितलें.

गोवा हे देशातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या राज्यांपैकी एक आहे. गोव्याला सर्व श्रेणींमध्ये भारतातील सर्व राज्यांमध्ये सर्वोत्तम स्थान देण्यात आले. हे देशातील पहिल्या तीन राज्यांपैकी एक आहे. राज्य सरकारच्या या कामगिरीमुळे अकराव्या वित्त आयोगाने पायाभूत सुविधांच्या बाबतीत गोव्याला देशातील सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून स्थान दिले आहे.

यावेळी उत्कृष्ट प्रशासकीय सेवेसाठी राज्यपालांच्याहस्ते उच्च शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, पोलीस अधिक्षक, अक्षत कौशल आणि प्रधान मुख्य वनपाल, प्रवीण कुमार राघव यांना मुख्यमंत्री पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

प्रजासत्ताक दिन कार्यक्रमास मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत, खासदार सदानंद शेट तानावडे, ॲड. जनरल देविदास पांगम, पोलीस महासंचालक आलोक कुमार आयपीएस, आमदार, सरकारी सचिव, विविध सरकारी खात्यांचे अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक, विध्यार्थी, व नागरिक उपस्थित होते.

Trending

Exit mobile version