गोवा खबर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना लोहरी, मकर संक्रांत, पोंगल आणि माघ बिहू या सणांनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या संदेशात राष्ट्रपती म्हणाल्या, “लोहरी, मकर संक्रांत, पोंगल आणि माघ बिहू या पवित्र सणांच्या निमित्ताने, मी देशात आणि परदेशात राहणाऱ्या सर्व भारतीयांना मनःपूर्वक शुभेच्छा देते.
हे उत्साह व आनंद घेऊन येणारे सण आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहेत. भारताच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात साजरे होणारे हे सण निसर्गाशी असलेले आपले साहचर्य दर्शवतात. या प्रसंगी लोक पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात तसेच दानधर्म देखील करतात.
या विविध पिकांशी निगडित असणाऱ्या सणांद्वारे आपण राष्ट्राला अन्न पुरवण्यासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. हे सण प्रत्येकाच्या जीवनात आनंद आणि समृद्धी घेऊन येवोत आणि भारताला एक विकसित देश बनवण्यासाठी आपण एकत्रित येऊन अधिक जोमाने कार्य करूया, असे त्या म्हणाल्या.