गोवा खबर:श्री हनुमान मंदिर, नवे-वाडे, वस्को येथील ‘भारतीय स्त्री शक्ति’ संस्था आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने २८ ते ३० डिसेंबर या कालावधीत नवे वाडे, वास्को येथील श्री हनुमान मंदिर येथे शौर्य प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.
शौर्य प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटन सोहळ्याला ‘भारत माता की जय’ संघटनेचे मुरगाव शाखेचे संघचालक श्री. कृष्णराव बांदोडकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्याच बरोबर ‘भारतीय स्त्री शक्ति’ संस्थेच्या मुरगाव शाखा अध्यक्षा सौ. अनुप्रीता गुरव, उपाध्यक्षा सौ. सविता सातर्डेकर, ‘हिंदु जनजागृती समिती’चे स्वसंरक्षण प्रशिक्षक श्री. अर्जुन खरात, श्री. श्रेयस पिसोळकर व कु. सुरभि छत्रे हे उपस्थित होते. कार्यक्रमात कु. सुरभि छत्रे यांनी स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे महत्त्व विशद केले. या तीन दिवसांत प्रशिक्षणार्थी युवतींना कराटे, दंडसाखळी, इत्यादींचे प्रशिक्षण देण्यात आले.
समारोपाच्या कार्यक्रमाला मुरगाव नगरपालिकेचे नगरसेवक श्री. यतिन कामुर्लेकर उपस्थित होते. यावेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रेयस पिसोळकर यांनी देशाभिमान व शौर्य जागवणारे विचार मांडले. यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. यतिन कामुर्लेकर यांनी आपल्या भाषणातून प्रशिक्षणार्थींना प्रोत्साहन देणारे विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘भारतिय स्त्री शक्ति, गोवा’ च्या अध्यक्षा सौ. ज्योती बांदोडकर यांनी केले. या तीन दिवसीय वर्गाचा २५ प्रशिक्षणार्थी युवतींनी लाभ घेतला.