गोवा खबर: गोवा पर्यटन विकास महामंडळ (जीटीडीसी) आणि पर्यटन खात्याने दूधसागर फेस्टाविस्टा, २५ डिसेंबर २०२४ रोजी गोव्यात कुळे येथील नयनरम्य मेतावाडो मैदानावर होणाऱ्या एक दिवसीय भव्य कार्यक्रमाची अधिकृतपणे घोषणा केली. हा कार्यक्रम संगीत, संस्कृती आणि सण समारंभाचा एक अनोखा मिलाफ सादर करण्यासाठी सज्ज आहे.
पत्रकार परिषदेत या कार्यक्रमाची घोषणा करताना, जीटीडीसीचे अध्यक्ष डॉ. गणेश गांवकर यांनी गोव्याच्या अंतर्गत प्रदेशातील सौंदर्याचा वेध घेताना, पर्यटन अनुभव वाढवण्यासाठी या उपक्रमाचे असलेले महत्त्व अधोरेखित केले. दूधसागर फेस्टाविस्टामध्ये बँड २४के, कशिश आणि बॉलीवूड बँड, डीजे अमीन आणि कॉमेडियन अहसान कुरेशी यांच्यासह प्रसिद्ध कलाकारांचे सादरीकरण असेल, ज्यामुळे सर्व उपस्थितांना एक आकर्षक अनुभव मिळेल. कार्यक्रमाचे होस्टिंग डायनॅमिक एमसी सेड्रिक करणार असल्याने या कार्यक्रमाला एक चैतन्यशील आकर्षण येईल.
पत्रकार परिषदेला श्री सुनील अंचिपाका, आयएएस, पर्यटन खात्याचे संचालक आणि जीटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक; श्री गेविन डायस, जीटीडीसीचे महाव्यवस्थापक; आणि श्री दीपक नार्वेकर, जीटीडीसीचे उपमहाव्यवस्थापक देखील उपस्थित होते.
डॉ. गणेश गावकर म्हणाले, की “दुधसागर फेस्टाविस्टामध्ये आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रम, उत्कृष्ट स्थानिक कलाकुसर, कारागीर आणि विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉल्ससह आकर्षक उपक्रम व अन्य आकर्षणे पहायला मिळतील. हा कार्यक्रम म्हणजे गोव्याच्या समृद्ध अश्या सांस्कृतिक वारशाचा आणि चित्तथरारक नैसर्गिक देणगीचा उत्सव आहे, जो पर्यटकांना राज्यातील प्रतिष्ठित सूर्य, समुद्र आणि वाळूच्या पलीकडे जाऊन अनोखे असे अनुभव घेण्याची संधी देतो. संस्मरणीय असे अनुभव निर्माण करण्यापलीकडे, हा उत्सव स्थानिक समुदायासाठी दीर्घकालीन फायद्यांना प्रोत्साहन देण्यास, नैसर्गिक संसाधनांचे जतन करण्यास आणि गोव्याच्या अंतर्गत प्रदेशांचे अद्वितीय आकर्षण सादर करण्यासाठी समर्पित आहे. स्थानिक समुदायाचा सक्रिय सहभाग, कारागीर, उद्योजक आणि साहसी ऑपरेटर्सना त्यांच्या कलागुणांचे व सेवांचे प्रदर्शन करण्यासाठी सक्षम बनवणे, सर्वसमावेशक आणि शाश्वत पर्यटनाच्या भावनेला खऱ्या अर्थाने मूर्त रूप देणे, हे या फेस्टचे वैशिष्ट्य आहे.”
पर्यटन संचालक आणि जीटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक श्री सुनील अंचिपाका, आयएएस यांनी सांगितले, की राज्यात अशा प्रकारचा महोत्सव पहिल्यांदाच होणार आहे. महोत्सवांतर्गत आम्ही या भागातील नैसर्गिक आकर्षणे दाखवत आहोत. त्यांनी यावेळी बोलताना पर्यटन खात्याच्या “गोवा बियॉन्ड बीचेस” उपक्रमावर आणि पुनरुत्पादक पर्यटनाच्या विविध पैलूंवर भर दिला.
हा महोत्सव जीटीडीसीच्या समुद्रकिना-या पलीकडे असलेल्या विविध आकर्षणांना प्रोत्साहन देण्यासाठी, राज्याच्या सांस्कृतिक समृद्धी आणि नैसर्गिक सौंदर्यावर भर देण्याच्या प्रयत्नांच्या दिशेने आणखी एक पाऊल आहे. दूधसागर फेस्टाविस्टा स्थानिक आणि पर्यटक दोघांनाही आकर्षित करेल, अशी अपेक्षा आहे, ज्यामुळे कुळेच्या शांत परिसरात ख्रिसमसच्या उत्साहामध्ये हा एक संस्मरणीय उत्सव साजरा होईल. जीटीडीसी सर्वांना या उत्सवात सामील होण्यासाठी आणि वर्षातील सर्वात मौजेच्या काळात, गोव्याच्या जादूचे साक्षीदार होण्यासाठी प्रोत्साहित करते आहे.