गोवा खबर:१०० टक्के आयएसओ प्रमाणित कौशल्य विकास खाते असलेले गोवा हे देशातील एकमेव राज्य आहे अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ताळगांव येथील गोवा विद्यापीठ मैदानावर राज्यस्तरीय गोवा मुक्ती दिन सोहळ्यात दिली.
मुख्यमंत्र्यांनी कौशल्य विकास आणि उद्योजकता संचालनालय मुख्यालयाने आयएसओ गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली ९००१:२०१५ प्रमाणपत्र प्राप्त केले आहे आणि १० सरकारी औध्योगिक प्रशिक्षण संस्थेला भारतीय गुणवत्ता प्रणाली नोंदणीद्वारे आयएसओ शैक्षणिक संस्था व्यवस्थापन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे असे सांगितले.
गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी अथक लढा देणाऱ्या डॉ. राम मनोहर लोहिया, मोहन रानडे आणि इतर स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे स्मरण करताना डॉ. सावंत यांनी त्या निर्णायक क्षणानंतर ६३ वर्षांनी गोवा प्रगतीपथावर आला आहे असे सांगितले. गोवा मुक्ती चळवळीत हुतात्मे झालेल्या १५ स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रथम पिढी कुटूंबाना राज्य सरकारने गोवा मुक्ती दिनाच्या पुर्व संध्येला प्रत्येकी १० लाख रूपये आणि मानपत्र देऊन सत्कार केला.
मुख्यमंत्र्यांनी उत्तर गोव्यातील अत्याधुनिक जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे उद्घाटन आणि मोपा लिंक सारख्या मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसह मुख्यमंत्री हेल्पलाइन- उत्तरदायी प्रशासन सुरू करणे, यासह सरकारच्या अनेक महत्त्वाच्या कामगिरीवर प्रकाश टाकला. मोपा जोड रस्ता आणि नवीन मोपा विमानतळ राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
अक्षय आणि हरित ऊर्जा प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करून शाश्वत विकास आणि पर्यावरणीय जबाबदारीसाठी सरकारच्या वचनबद्धतेला त्यांनी दुजोरा दिला. पर्यावरण संरक्षण आणि उपजीविका पुनर्संचयित करण्यावर भर देऊन शाश्वत पद्धतीने खाणकाम पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरूच राहतील असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी गोव्यातील लोकांना दिले.
दुहेरी नागरिकत्व स्वीकारणे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची अंमलबजावणी करणे आणि थेट लाभ हस्तांतरणासाठी एक आदर्श राज्य अशा अनेक क्षेत्रात गोवा आघाडीवर आहे. म्हादई नदीच्या पाण्यावरील जनतेच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी सरकारही संबंधित प्राधिकरणामार्फत योग्य ती पावले उचलत आहे असे ते म्हणाले.
सरकारने शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबवून महिला सक्षमीकरणात लक्षणीय प्रगती केली आहे. गोवा राज्य ग्रामीण उपजीविका अभियान आणि दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानासारखे कार्यक्रम महिलांना स्वयं-मदत गट तयार करण्यात मदत करीत आहेत यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भर दिला. या प्रयत्नांमुळे महिलांना स्वयंरोजगार आणि कौशल्याधारित कामात गुंतवून घेण्यास सक्षम केले आहे ज्यामुळे उत्पन्नात वाढ आणि आर्थिक स्वातंत्र्य वाढले असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्र्यांनी गोव्यातील जनतेला १०० टक्के साक्षरता गाठण्यासाठी, प्रत्येक मुलाला शिक्षणाने सक्षम करण्यासाठी, शाश्वत पर्यटनाला चालना देण्यासाठी, हरित ऊर्जा आणि हवामानातील लवचिकतेच्या उपक्रमांना सहकार्य देण्यासाठी आणि गोव्याला एकता आणि शांततेची भूमी बनविण्यासाठी सामाजिक सलोखा मजबूत करण्यास वचनबद्ध करण्याचे आवाहन केले. गोव्याचे २०३७ पर्यंत “विकसित गोवा” मध्ये रूपांतर करून “विकसित भारत २०४७ चे स्वप्न साध्य केले जाईल यावरही त्यांनी भर दिला.
या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनेक व्यक्तींना त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल सन्मानित करण्यात आले. त्यात श्री सुदेश नाईक, श्री प्रमोद कुस्ता सराफ, श्रीमती वर्षा नागेश नागोजी, श्री प्रल्हाद आनंद मयेंकर आणि श्री विजय मोहन सुर्लीकर यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती गृहरक्षक आणि नागरी संरक्षण पदक मिळाले.
मुख्यमंत्र्यांनी अनेक पोलीस अधिकाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी मुख्यमंत्री पोलीस (सुवर्ण) पदके आणि अग्निशमन सेवा, होमगार्ड आणि नागरी संरक्षण पदकांसह मुख्यमंत्री शौर्य पुरस्कार, कृषी विभूषण, कृषी भूषण, कृषी रत्न पुरस्कार प्रदान केले आणि स्वयंपूर्ण गोवा २.० कार्यक्रमाअंतर्गत उत्कृष्ट समाज सेवकांचा सत्कारही केला.
सुरवातीस मुख्यमंत्र्यांनी परेड आणि मार्च पास्टचे निरीक्षण केले. मार्चपास्टचा निकालही जाहीर करण्यात आला त्यात श्री शांतादुर्गा हायस्कूल, डिचोलीने प्रथम पारितोषिक पटकावले. व्दितीय पारितोषिक श्री भूमिका हायस्कूल, पर्ये, सत्तरी, तर तृतीय पारितोषिक श्री सारस्वत विद्यालय हायस्कूल, म्हापसा यांना मिळाले.
या कार्यक्रमाला वीज मंत्री श्री रामकृष्ण उर्फ सुदिन ढवळीकर, नगर नियोजन मंत्री श्री आतानासियो मॉन्सेरात, आमदार श्री रुडॉल्फ फर्नांडिस, मुख्य सचिव, डॉ. व्ही. कांदेवेलू, आयएएस, पोलीस महासंचालक श्री आलोक कुमार, (आयपीएस); सचिव, श्री रमेश वर्मा (आयएएस), सचिव शिष्टाचार, श्री संजीत रॉड्रिग्ज, उत्तर गोवा जिल्हाधिकारी डॉ स्नेहा गित्ते, आयएएस आणि इतर अधिकारी उपस्थित होते.