गोवा खबर

दिप पर्व २०२४: संस्कृती, परंपरा आणि एकतेचा भव्य उत्सव

Published

on

Spread the love
गोवा खबर: गोवा सरकारच्या पर्यटन खात्याने १५ डिसेंबर २०२४ रोजी पर्वरी येथील नयनरम्य अश्या आर्ट पार्कमध्ये, दिप पर्व २०२४चे यशस्वीपणे आयोजन केले. या कार्यक्रमाने गोव्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा साजरा केला आणि समाजात एकतेची भावना व सामुदायिक सहभागाला प्रोत्साहन दिले.
माननीय पर्यटन मंत्री श्री रोहन ए. खंवटे आणि पर्यटन खात्याचे संचालक श्री सुनील अंचिपाका, आयएएस, यांच्या सन्माननीय उपस्थितीने हा कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसन्न वातावरणात भर घालत स्थानिक लोकप्रतिनिधींसह सुकूरच्या सरपंच सोनिया पेडणेकर, पेन्हा दे फ्रँका सरपंच श्री स्वप्नील चोडणकर, हळदोणा  सरपंच श्री गोविंद गोवेकर आणि पेन्हा दे फ्रँका, सुकूर, साल्वादोर दो मुंडो आणि हळदोणा येथील सर्व पंचायत सदस्यांनी या उत्सवात सक्रिय सहभाग घेतला. पर्यटन खात्याचे प्रतिनिधी म्हणून पर्यटन उपसंचालक श्री राजेश काळे, महाव्यवस्थापक (मार्केटिंग) जीटीडीसी श्री गेविन डायस, उपमहाव्यवस्थापक (मार्केटिंग) जीटीडीसी श्री दीपक नार्वेकर आणि पर्यटन माध्यम सल्लागार श्री सागर अग्नि यावेळी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने गोव्याचा सांस्कृतिक वारसा जोपासण्यासाठी खात्याची असलेली बांधिलकी अधोरेखित झाली.
या उत्सवाची सुरुवात विविध स्पर्धांच्या मालिकेने झाली, ज्यामध्ये स्थानिक आणि अभ्यागतांचा उत्साहपूर्ण सहभाग दिसून आला. यात पुढील स्पर्धांचा समावेश होता: नृत्य स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, पाककला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आणि पोस्टर बनवण्याची स्पर्धा. या स्पर्धांनी समाजातील सर्जनशीलता आणि प्रतिभा अधोरेखित केली आणि उत्सवामध्ये नवचैतन्य आणले.
मुख्य कार्यक्रमाची सुरुवात संध्याकाळी ‘आरंभ’च्या सादरीकरणाने झाली, त्यानंतर ‘निर्भय भव’ ग्रुपचे पारंपरिक गणपती स्तवन आणि थीमॅटिक कोकणी नृत्य सादरीकरण झाले. तसेच गिरीश कला संस्कृती मंडळ सावर्डे यांनी सादर केलेल्या कुणबी लोकनृत्यासह सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले.
उपमहाव्यवस्थापक (मार्केटिंग) जीटीडीसी श्री दिपक नार्वेकर यांनी गोवा पर्यटन खात्याच्या वतीने सर्वांप्रती आभार व्यक्त केले.
अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करताना, माननीय पर्यटन मंत्री श्री रोहन ए. खंवटे म्हणाले, कि “ या ‘दिप पर्व’च्या माध्यमातून आम्ही गोव्याच्या सांस्कृतिक अस्मितेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि पुनरुत्पादक पर्यटनाप्रती दृष्टीकोन पुढे नेण्याच्या आमच्या वचनबद्धतेला बळकटी देत ​​आहोत. यासारखे कार्यक्रम वारसा आणि विकास यातील अंतर कमी करतात तसेच स्थानिक आणि अभ्यागत दोघांनाही आपल्या परंपरा दाखवतात. सांस्कृतिक अभिव्यक्ती साजरी करून, आम्ही सामुदायिक सहभागासाठी संधी निर्माण करत आहोत, स्थानिक प्रतिभेला पाठिंबा देत आहोत आणि शाश्वत पर्यटन उपक्रम राबवित आहोत. ‘दिप पर्व’ हा उत्सवापेक्षा अधिक आहे. ही एक चळवळ आहे, जी आर्थिक वाढ आणि समुदाय कल्याणाला चालना देत, वारसा जतन करण्याच्या गोव्याच्या समर्पणावर प्रकाश टाकते.”
पर्यटन खात्याचे संचालक आणि व्यवस्थापकीय संचालक जीटीडीसी श्री सुनील अंचिपाका, आयएएस, पुढे म्हणाले, कि “’दिप पर्व’ने कलाकारांना त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे तसेच समुदायाच्या सहभागाला प्रोत्साहन दिले आहे आणि आपुलकीची भावना वाढवली आहे. आपला सांस्कृतिक वारसा पुढच्या पिढ्यांपर्यंत पोचून त्याची अधिक भरभराट होईल, याची खात्री करून, स्थानिक आणि पर्यटक दोघांनाही फायदा होईल, अशा प्रकारे गोव्याच्या परंपरेचे जतन आणि संवर्धन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पर्यटन खाते गोव्याचा सांस्कृतिक वारसा साजरा करणारे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी प्रयत्नरत आहे.”
कार्यक्रमात श्रेया कांबळी (कारे येथील ब्युटीशियन), संगीता नीलेश हडफडकर (कारेमधील किड्स स्कूलच्या संस्थापक), सुनैना सुनील पेडणेकर (केटरिंग सेवा आणि कॅन्टीनच्या मालक), शोभा वझरकर (जनरल स्टोअरच्या मालक), शैलजा गावस (सुपर मार्केटच्या मालक), सावनी शेट्ये (इतिहासकार) आणि योगेश कापडी (गोवा राज्य कलावृद्धी पुरस्कार विजेते) यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी पर्यटन मंत्री श्री रोहन ए. खंवटे यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. या व्यक्तींचे समर्पण आणि परिश्रम समाजातील प्रगती, एकता आणि परंपरा यांना प्रेरणा देतात.
प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या फायर नृत्य, बॉलीवूड नृत्य आणि लाईव्ह संगीत बँडच्या सादरीकरणाच्या आकर्षक कामगिरीसह या संध्याकाळचा समारोप झाला.
दीप पर्व २०२४ हा सांस्कृतिक अभिव्यक्ती, सामुदायिक सहभाग आणि आनंददायी उत्सव यांचे परिपूर्ण मिश्रण देणारा कार्यक्रम होता, जो जबरदस्त यशस्वी झाला. गोवा सरकारचे पर्यटन खाते हे गोव्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा कायम ठेवतात आणि एकजुटीची भावना वाढवतात अशा उपक्रमांना चालना देण्यासाठी समर्पित आहे.

Trending

Exit mobile version