गोवा खबर : माजी मुख्यमंत्री आणि भारताचे माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांची ६९ वी जयंती सरकारतर्फे साजरी करण्यात आली. यानिमित्त आज मनोहर पर्रीकर स्मृती स्थळ मिरामार येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कायदा व न्याय मंत्री आलेक्स सिक्वेरा आणि जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांच्यासमवेत समाधी स्थळावर पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. गोव्यातील विविध छायापत्रकारांनी क्लिक केलेल्या मनोहर पर्रीकर यांच्या जीवन आणि कार्यावरील छायाचित्र प्रदर्शनाचेही त्यांनी उद्घाटन केले आणि त्यांच्या चित्राचे अनावरणही केले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्याला विकसित राज्य बनविण्याचे स्वप्न पाहणारे महान द्रष्टे नेते म्हणून गोव्यातील जनता स्वर्गिय मनोहर पर्रीकर यांना कायम स्मरणात ठेवतील असे सांगितले. गोव्याच्या कल्याणासाठी त्यांनी समर्पितपणे काम केले होते आणि गोव्याला विकासाच्या अधिक उंचीवर नेण्यासाठी त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे असे ते म्हणाले. त्यांनी सुरू केलेली बहुतांश कामे पूर्ण केली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. सरकारने पायाभूत सुविधांचा विकास साधला असून गोव्याच्या विकासासाठी त्यांनी दिलेले मोठे योगदान आपल्याला सदैव मार्गदर्शन करील असे ते म्हणाले.
यावेळी हेडगेवार हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्व. मनोहर पर्रीकर यांच्या जीवन आणि कार्यावर पथनाट्य सादर केले.
यावेळी सरव्यवस्थापक संदिप प्रभू चोडणकर, पर्रीकरांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर, विविध सरकारी खात्यांचे अधिकारी आदी उपस्थित होते.