-
उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री दारासिंह चौहान आणि जलशक्ती मंत्रालयाचे राज्यमंत्री रामकेश निषाद यांचा प्रमुख सहभाग
गोवा खबर : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेश सरकारने महाकुंभ-२०२५ ला भारताच्या सांस्कृतिक एकतेचे जागतिक प्रतीक बनवण्याचा निर्धार केला आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, उत्तर प्रदेश राज्याचे कारागृह मंत्री दारासिंह चौहान आणि जलशक्ती मंत्रालयाचे राज्यमंत्री रामकेश निषाद यांनी गोव्यातील पणजी शहरात आयोजित एका भव्य रोड शोचे नेतृत्व केले.
त्यांनी महाकुंभ हा भारताच्या विविधतेतील एकतेचा अनोखा उत्सव म्हणून अधोरेखित करून गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि सर्व गोमंतकीयांना या उत्सवात सहभागी होण्याचे औपचारिक निमंत्रण दिले. या महाकुंभ उत्सव ऐतिहासिक होण्यासाठी तसेच आंतरराष्ट्रीय सहभाग वाढवण्यासाठी आणि सहभागी नागरिकांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्याची निश्चिती करण्याबाबत उत्तर प्रदेश सरकार व्यापक पावले उचलत असल्याची माहिती कारागृह कॅबिनेट मंत्र्यांनी दिली. रोड शोनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, महाकुंभ सोहळा हा भारताच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक चेतनेचा आत्मा आहे तसेच ‘एक भारत-श्रेष्ठ भारत-समावेशी भारत’ (एक भारत, महान भारत, समावेशी भारत) या विचाराचे दिव्य आणि चैतन्यशील प्रतिनिधित्व आहे.
दारासिंह चौहान म्हणाले, आपल्यापैकी अनेकांनी २०१९ साली प्रयागराजमध्ये झालेल्या महाकुंभ उत्सवाचा ‘दिव्य आणि भव्य’ अनुभव घेतला असेल. हा उत्सव जागतिक मंचावर भारताच्या सांस्कृतिक अभिमानाचे अमिट प्रतीक बनला होता. तसेच या उत्सवाच्या प्रभावी व्यवस्थापनाबाबतही जगभरातून मोठे कौतुक व प्रशंसा झाली होती. या वर्षीचा महाकुंभ भव्यता आणि दिव्यता या दोन्ही बाबतीत मागील महाकुंभाला मागे टाकेल, असा विश्वासही त्यंनी व्यक्त केला. प्रयागराज महाकुंभ-२०२५मध्ये ४५ कोटी यात्रेकरू, संत, तपस्वी आणि पर्यटक सहभागी होण्याची अपेक्षा आहे. यासाठी उत्तर प्रदेश सरकारने व्यापक व्यवस्थापन हाती घेतले आहे, असेही त्यांनी सांगितले.
चौहान म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली, प्रयागराजमध्ये १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या संगमाच्या पवित्र तिरावर महाकुंभचे आयोजन केले जात आहे. संयुक्त राष्टसंघाद्वारे मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून दखल घेतलेला हा महाकुंभ प्रयागच्या पवित्र भूमीवर १२ वर्षांनंतर पुन्हा आयोजित केला जात आहे.
स्वच्छ, स्वस्थ, सुरक्षित आणि हरित महाकुंभ
चौहान म्हणाले, हा एक स्वच्छ, आरोग्यदायी, सुरक्षित आणि डिजिटल महाकुंभ असेल. सिंगल-युज प्लास्टिकचा वापरमुक्त असा हा उत्सव घोषित करून हा कार्यक्रम पर्यावरणपूरक बनविण्याची प्रतीज्ञा करण्यात आली आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून महाकुंभ परिसरात विक्रेत्यांना दालने देण्यात येणार आहेत. तसेच स्वच्छतेवर भर देण्यासाठी जिल्ह्यातील ४०० शाळांच्या मुख्याध्यापकांसमवेत बैठका घेण्यात आल्या आहेत. स्वच्छ महाकुंभाचा उपक्रमाची माहिती ४ लाख विद्यार्थ्यांपर्यंत तसेच प्रयागराजच्या ५पट लोकसंख्येपर्यंत पोहोचवण्यात येत आहे. त्याशिवाय, ‘हर घर दस्तक’ मोहिमेअंतर्गत, एकल-वापर प्लास्टिकमुक्त पर्यावरणाचा संदेश प्रत्येक घरापर्यंत दिला जात आहे.
महाकुंभ महोत्सव-२०२५ हा स्वच्छ आणि हरित होईल यावर विशेष भर देण्यात आल्याचे त्यांनी अधोरेखित केले. प्रयागराजमध्ये सुमारे तीन लाख रोपांची लागवड करण्यात आली असून उत्तर प्रदेश सरकारने या उत्सवाच्या सांगतेनंतरी या झाडांची देखभाल सुनिश्चित करण्याचे वचन दिले आहे.
यात्रेकरू, साधू, संत आणि पर्यटकांसाठी व्यापक आरोग्य सुविधा
आरोग्य आणि स्वच्छतेबाबत विशेष लक्ष देऊन महाकुंभची तयारी करण्यात येत असल्याची माहिती कारागृहमंत्री चौहान यांनी दिली. यात्रेकरू, साधू, संत, महाकुंभातील कल्पवास पाळणारे नागरिक तसेच पर्यटकांसाठी आरोग्यसेवा व्यवस्थेचा समावेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महोत्सव स्थळी मोठ्या संख्येने तज्ज्ञ डॉक्टर तैनात करण्यात आले आहेत. परेड ग्राऊंडवर १०० खाटांचे रुग्णालय उभारण्यात आले आहे. प्रत्येकी २० खाटांची आणखी दोन रुग्णालये आणि ८ खाटांची छोटी रुग्णालयेही तयार करण्यात आली आहेत. महोत्सव परिसर आणि अरैल येथे लष्कराच्या रुग्णालयाने १० खाटांची दोन आयसीयू उभारले आहेत. या रुग्णालयांमध्ये २४ तास डॉक्टर तैनात असतील. एकूण, २९१ एमबीबीएस डॉक्टर आणि तज्ञ, ९० आयुर्वेदिक आणि युनानी तज्ञ आणि १८२ परिचारिक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. शिवाय या रुग्णालयांमध्ये पुरुष, महिला आणि मुलांसाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आले आहेत. डिलिव्हरी रूम, इमर्जन्सी वॉर्ड आणि डॉक्टर्स रूम देखील उपलब्ध असतील.
भाविकांनाही अनुभवता येणार डिजिटल महाकुंभ
चौहान म्हणाले , उत्तर प्रदेश सरकार दिव्य, भव्य आणि डिजिटल महाकुंभ आयोजित करण्यासाठी वचनबद्ध आहे. या महोत्सवाच्या तयारीमध्ये एक समर्पित वेबसाइट आणि ॲप लॉन्च करणे, ११ भाषांमध्ये एआय-चलित चॅटबॉट, लोक आणि वाहनांसाठी क्यूआर-आधारित प्रवेशिका, बहुभाषिक डिजिटल असे हरवले-सापडले केंद्र, स्वच्छता आणि तंबूंसाठी आयसीटी मॉनिटरिंग, जागा आणि सुविधा वितरणासाठी सॉफ्टवेअर, बहुभाषिक डिजिटल साइनेज (VMD), स्वयंचलित रेशन पुरवठा प्रणाली, ड्रोन-आधारित देखरेख व्यवस्था आणि आपत्ती व्यवस्थापन, ५३० प्रकल्पांच्या संनियंत्रणासाठी लाइव सॉफ्टवेअर, इन्व्हेंटरी ट्रॅकिंग प्रणाली आणि महोत्सव स्थळावरील सर्व स्थानांचे गुगल नकाशांवर एकत्रीकरण आदी व्यवस्थांचा समावेश आहे.
पर्यटकांच्या सोयीसाठी स्मार्ट पार्किंग सुविधा
पर्यटकांना पार्किंगची समस्या उद्भवू नये यासाठी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती चौहान यांनी दिली. या संदर्भात, १०१ स्मार्ट पार्किंग सुविधा तयार करण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये दररोज पाच लाख वाहने बसू शकतील. हे पार्किंग क्षेत्र १८६७.०४ हेक्टरमध्ये पसरलेले आहे. २०१९ सालच्या उत्सवासाठी वितरित केलेल्या ११०३.२९ हेक्टरच्या तुलनेत यावेळी ७६३.७५ हेक्टर अधिक जागा पार्किंगसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. या पार्किंग सुविधांचे इंटिग्रेटेड कंट्रोल कमांड सेंटरद्वारे निरीक्षण केले जाणार आहे.
स्वच्छ पेयजल व्यवस्था, एकात्मिक नियंत्रण कमांड सेंटर आणि रिव्हरफ्रंटसह ४४ घाटांवर पुष्पवृष्टी
चौहान यांनी महाकुंभाच्या व्यवस्थेची माहिती दिली. शहरात भाविकांच्या स्नानाच्या सोयीसाठी सध्याचे ३५ कायमस्वरूपी घाट आणि ९ नवीन घाट बांधण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. १२ किलोमीटरच्या परिसरात पसरलेल्या सर्व ४४ घाटांवर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. त्यांनी पुढे नमूद केले की, मुंबईच्या मरिन ड्राईव्हच्या धर्तीवर संगम ते नागवासुकी मंदिर, सूरदास ते छटनाग आणि कर्झन ब्रिज ते महावीरपुरीपर्यंत १५.२५ किलोमीटर लांबीच्या गंगा तिरावर रिव्हरफ्रंट विकसित करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, गर्दीचे व्यवस्थापन वाढविण्यासाठी एकात्मिक संनियंत्रित कमांड सेंटर विकसित केले गेले आहे. रिअल-टाइम सीसीटीव्ही मॉनिटरिंगसाठी ५२ आसनी सुविधेसह सुसज्ज चार निरिक्षण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
तंत्रज्ञानाच्या साह्याने महाकुंभमधील यात्रेकरूंची होणार गणना
चौहान यांनी सांगितले की, प्रयागराज महाकुंभ-२०२५मध्ये सुमारे ४५ कोटी भाविक सहभागी होण्याची अपेक्षा असून हा एक नवा मापदंड स्थापित होणार आहे. प्रत्येक यात्रेकरूची गणनानिश्चिती करण्यासाठी तीन तांत्रिक गणनापद्धतींचा अवलंब केला जाणार आहे.
पहिली गणनापद्धथी ही वैशिष्ट्याधारित शोध पद्धती आहे. यामध्ये कॅमेऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तीच्या वैशिष्ट्यांच्या आधारे ट्रॅकिंग केले जाईल. दुसऱ्या पद्धतीमध्ये आरएफआयडी रिस्टबँडचा समावेश आहे. असे रिस्टबँड यात्रेकरूंना पुरविले जाणार आहेत. या रिस्टबँड्सद्वारे, आरएफआयडी रीडरच्या माध्यमातून प्रत्येक यात्रेकरूचा प्रवेश आणि निकास वेळ तपासली जाणार आहे. तिसरी पद्धत म्हणजे मोबाईल ॲप ट्रॅकिंग होय, यामध्ये यात्रेकरूंच्या संमतीने, मोबाईल ऍप्लिकेशन वापरून जीपीएस प्रणालीद्वारे त्यांचे स्थान ट्रॅक केले जाणार आहे.
भारताच्या विविधतेतील एकतेची शाश्वत आणि एकात्म भावना म्हणजे महाकुंभ
निषाद यांनी सांगितले की, पवित्र पाण्यात केवळ धार्मिक स्नान करणे किंवा जत्रा एवढ्यापुरतेच कुंभ महोत्सावचे महत्व मर्यादित नाही तर विविधतेने नटलेल्या भारताच्या एकतेची चिरंतन आणि एकरूप भावना म्हणजे हा कुंभमेळा होय. महाकुंभ हा एक भव्य उत्सव आहे जो सर्व मतभेद, वाद आणि विभागणी नदीच्या पवित्र प्रवाहात विसर्जित करत सामाजिक समरसतेचे अद्वितीय उदाहरण आहे. संपूर्ण भारतासाठीच नव्हे, तर जगभरातील भारतीय संस्कृतीच्या अनुयायांसाठी या सणाचे विशेष महत्त्व आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशचे डबल-इंजिन सरकार महाकुंभाच्या दुर्मिळ आणि अत्यंत प्रतिष्ठित धार्मिक कार्यक्रमाचे सांस्कृतिक, अध्यात्मिक, पारंपारिक आणि पौराणिक सार जागतिक मंचावर अनोख्या पद्धतीने सादर करत असल्याचे निषाद यांनी सांगितले. सनातन भारतीयांचा भव्य उत्सव असलेला महाकुंभ-२०२५ साजरा करण्यासाठी उत्तर प्रदेश राज्य सरकार भारतातील सर्व राज्यांना आणि संपूर्ण जगाला निमंत्रित करत आहे. या पवित्र यात्रेत सहभागी व्हावे असे विनम्र आमंत्रण घेऊन आज आम्ही गोव्यातील या कार्यक्रमात आलो आहोत, असेही निषाद यांनी सांगितले.