गोवा खबर : मिनेझिस ब्रागांझा संस्थेतर्फे गोव्यातील उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी गोवा मुक्ती दिनाच्या पूर्वसंध्येला 18 रोजी दुपारी 2 वाजल्यापासून गोव्याचा इतिहास, स्वातंत्र्य लढा, कला आणि संस्कृती, वेशभूषा, पाककृती, वारसा अशा विषयांवर प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच प्रेक्षकांसाठीही बसल्या ठिकाणी प्रश्न सोडवा असणार आहे.
मिनेझिस ब्रागांझा संस्थेने गोव्यातील उच्च माध्यमिक शाळांना उच्च माध्यमिक म्हणजे अकरावी आणि बारावी इयत्तेच्या दोन विद्यार्थ्यांची टीम नियुक्त करण्याची विनंती केली आहे. कार्यक्रमात उच्च माध्यमिक शाळेचे प्रतिनिधीत्व करणार्या प्रत्येक उच्च माध्यमिक शाळेला सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. तसेच यशस्वी संघांना प्रमाणपत्रासह रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. सविस्तर माहिती प्रत्येक उच्च माध्यमिक शाळेला पाठवण्यात आली आहे.
या स्पर्धेचे पारितोषिक वितरण त्याच दिवशी सायंकाळी 4 वाजता कला व संस्कृती संचालक सगुण वेळीप यांच्या हस्ते अध्यक्ष दशरथ परब आणि सदस्य सचिव अशोक परब यांच्या उपस्थितीत केले जाईल. प्रश्नमंजूषा रोटेरियन भालचंद्र आमोणकर आणि त्यांची टीम घेईल.