गोवा खबर : ओडिशा राज्याच्या अभ्यास दौर्यावर गेलेल्या राज्यातील ग्रामीण पत्रकार संघाच्या सदस्यांनी ओडिशाचे राज्यपाल रघुवीर दास यांची राजभवनवर भेट घेतली.
माहिती खात्याचे संचालक दीपक बांदेकर आणि खात्याच्या अधिकार्यांसह ग्रामीण पत्रकार संघाच्या सदस्यांनी भुवनेश्वर येथे राज्यपालांची भेट घेतली. राज्यपाल रघुवीर दास यांनी पत्रकारांचे स्वागत केले आणि विविध राज्यांची संस्कृती जाणून घेण्यासाठी असे अभ्यास दौरे आवश्यक असल्याचे सांगितले.
बांदेकर यांनी राज्यपालांना गोव्यातील पारंपरिक कुणबी शाल आणि नंदादीप दिला. पत्रकारांनी ओडिशा विधानसभेचे सभापती सुरमा पाधी यांचीही भेट घेतली. तसेच ओडिशा विधानसभेचे कामकाज पाहिले.
बांदेकर यांच्यासह माहिती अधिकारी किरण मुनानकर, साहाय्यक माहिती अधिकारी श्याम गावकर, माहिती साहाय्यक सिद्धेश सामंत, गोवा ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष उदय सावंत तसेच इतर पत्रकार सदस्य भुवनेश्वरच्या अभ्यास दौर्यावर आहेत.