गोवा खबर

एशिया-पॅसिफिक डेफ गेम्समध्ये ऐतिहासिक कामगिरी केल्याबद्दल डॉ. मनसुख मांडविया यांनी केला भारतीय संघाचा सन्मान

Published

on

Spread the love

गोवा खबर : मलेशियामध्ये क्वालालंपूर येथे झालेल्या 10 व्या एशिया-पॅसिफिक डेफ गेम्समध्ये तब्बल 55 पदके जिंकून इतिहास घडवणाऱ्या भारतीय संघाला आज मायदेशी परतल्यावर,केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि कामगार आणि रोजगारमंत्री डॉ.मनसुख मांडविया यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यापूर्वी 2015 मध्ये झालेल्या स्पर्धेत भारतीय संघाने केवळ 5 पदके जिंकली होती, त्या तुलनेत यंदा तब्बल 11 पट वाढ झाली आहे.

42 पुरुष आणि 26 महिला खेळाडू असलेल्या या 68 सदस्यांच्या चमूने 8 सुवर्ण, 18 रौप्य आणि 29 कांस्य पदके पटकावून या स्पर्धेत  अभूतपूर्व कामगिरी करत 21 देशांच्या पदकतालिकेत पाचवे स्थान पटकावले.1984 पासून या स्पर्धेला सुरुवात झाल्यापासून दर चार वर्षांनी होणाऱ्या या स्पर्धांमध्ये भारताने केलेली ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.यापूर्वी 2015 मध्ये तैवानमध्ये झालेल्या स्पर्धांमध्ये भारतीय चमूने दोन सुवर्ण तीन रौप्य पदकांसह एकूण पाच पदके मिळवली होती.तर 2019 ची स्पर्धा हाँगकाँगमधील अस्थिर परिस्थितीमुळे रद्द झाली होती.

या कामगिरीबद्दल केंद्रीय मंत्र्यांनी भारतीय संघातील खेळाडूंबरोबरच प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचारी वर्गाचे त्यांच्या निवासस्थानी एका विशेष कार्यक्रमात संवाद साधताना अभिनंदन केले.

मलेशियात झालेल्या एशिया पॅसिफिक डेफ गेम्समध्ये 55 पदके पटकावून देशाची मान अभिमानाने उंचावून गौरव प्राप्त करून देणाऱ्या भारतीय श्रवण-विकलांग चमूचे मी अभिनंदन करतो.आपला देश क्रीडा क्षेत्रात आगेकूच करत आहे.भारत सरकार क्रीडा पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी, शासन आणि विशेष प्रकारच्या प्रशिक्षण सुविधा देण्यासाठी  विविध पावले उचलत आहे. ज्यावेळी तुम्ही राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धांमध्ये सहभागी होता तेव्हा तुम्ही केवळ स्वतःसाठी जिंकत नाही तर तुमच्यासोबत तुम्ही देशाला देखील विजयी करता, असे मांडविया यांनी या चमूला संबोधित करताना सांगितले.

 

Trending

Exit mobile version