गोवा खबर : राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण मंडळातर्फे ‘शालेय शिक्षणातील परिवर्तनाचा आधार म्हणून नवीन राज्य अभ्यासक्रम फ्रेमवर्क (एससीएफ’) या विषयावर आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन राजभवनातील दरबार सभागृहात झाले.
यावेळी भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव आनंदराव पाटील, शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, आयएएस, नवी दिल्लीतील राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण मंडळाचे संचालक, प्रा. दिनेश प्रसाद सकलानी, एनआयईपीएचे कुलगुरू प्रा. शशिकला वंजारी, शिक्षण संचालक शैलेश झिंगडे, संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण, मंडळाच्या संचालक मेघना शेटगावकर उपस्थित होत्या.
पाटील यांनी समाजातील शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणे हे एक सरकारचे प्रयत्न आहे असे सांगून त्यासाठी विविध डिजीटल माध्यमांचा वापर करण्यात येतो असे त्यांनी पुढे सांगितले. अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
लोलयेकर यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने उचललेल्या पावलांवर प्रकाश टाकला. त्यांनी दोन टास्क फोर्स, एक शालेय शिक्षण आणि एक उच्च शिक्षणासाठी आणि विशिष्ट कार्यांच्या अंमलबजावणीसाठी समित्या स्थापन केल्या आहेत असे ते म्हणाले. एनईपीच्या अंमलबजावणीमध्ये राज्य संक्रमणाच्या टप्प्यात आहे आणि निश्चितच समस्या असतील ज्यांचे निराकरण केले जाणार आहे. एनईपीवर भर देऊन दर्जेदार शिक्षण, परवडणारी क्षमता, प्रवेश आणि समानता यावर लक्ष केंद्रित केले आहे. विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी एनईपी पुढील शैक्षणिक वर्षापासून लागू करण्यात येईल असेही ते म्हणाले.
सकलानी यांनी एनईपी हे बालकाचा सर्वांगिण विकास करण्याच्या उद्देशाने एक परिवर्तनशील धोरण आहे. एनईपीच्या अंमलबजावणीतील पायाभूत टप्प्याच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला आणि तो एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे म्हटले आहे आणि त्याच्या यशासाठी समाजाचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे असे ते म्हणाले.
शेटगावकर यांनी आपल्या स्वागतपर भाषणात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने राज्य अभ्यासक्रम आराखडा संरेखित करण्यासाठी हे चर्चासत्र एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे असे सांगितले.